सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)
टाकळीभान प्रतिनिधी- पंचायत समितीच्या मा. सभापती व प्राईडच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे व माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक माऊली मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भेर्डापूर-वांगी येथे सुरु असलेल्या प्राईड अॅकेडमी इंग्लिश मेडीअम स्कूलच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा व विद्यार्थी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यात एम.पी.एस.सी. परीक्षेत १७ व्या क्रमांकाने यश संपादन करत डी.वाय.एस.पी. पदासाठी निवड झालेले गणेश तमनर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शासकीय महाविद्यालय मुंबई येथे निवड झालेले निशांत चव्हाण, एम.पी.एस.सी. परीक्षेत मेन्स परीक्षेसाठी पात्र असलेले दत्ता देवकाते, रायगड येथे गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत असणारे विनोद खेडेकर आदी. मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम शाळेच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. परीक्षेच्या संदर्भाने मार्गदर्शन केले.
आपल्या भवितव्यासाठी खडतर परिश्रम करावे कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता सर्व परीक्षा, मुलाखती यांना सामोरे जावे. त्यासाठी योग्य ती पुस्तके वापरावीत व इंटरनेटचा वापर करावा. अती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राईड अकॅडेमीमुळे योग्य मार्गदर्शन मिळत आहे. येथील शैक्षणिक वातावरण हे विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी पूरक आहे.
यानंतर प्रमुख पाहुण्यांनी सभागृहातच थांबून विद्यार्थ्यांशी हितगुज साधले, विद्यार्थ्यांमध्ये असणारी स्पर्धा स्पर्धा परीक्षेसंदर्भातील आवड जाणून घेतली. त्यांच्याशी सामान्य अध्ययन, चालू घडामोडी, महाराष्ट्राचा अभ्यास याविषयी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसाद पाहता ते भारावून गेले होते. निश्चितच येथील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करतील व आपले भविष्य घडवतील. येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना मला खूप आनंद होत आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली ताके यांनी केले. उपप्राचार्य प्रदीप गोराणे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला. कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या प्रीती गोटे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments