सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)
सोनगाव,प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द (ता. संगमनेर) येथे ब्रम्हलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित फिरता १९ वा नारळी अखंड हरिनाम सप्ताह यंदा मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर ते मंगळवार, दि. २ डिसेंबर २०२५ दरम्यान मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन रामेश्वर व उबरेश्वर मठाचे महंत ह.भ.प. दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दाढ खुर्द पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
सप्ताहाचा शुभारंभ म्हणून बुधवार, दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी महंत दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण विधिवत पार पडणार आहे. दाढ फाटा परिसरातील तब्बल १५ एकर क्षेत्रावर सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, भगव्या पताकांनी व टाळमृदुंगाच्या गजरात संपूर्ण परिसर मंगलमय झाला आहे.
या प्रसंगी २५ फूट उंच भगवा ध्वज उभारण्यात येणार असून, वारकरी संप्रदायाच्या जयघोषात हरिनामाचा अखंड जप सुरू राहणार आहे. भाविकांनी भगव्या वेशात, टाळ-चिपळ्या घेऊन हरिनामात रंगण्याची तयारी केली आहे.
सप्ताहकाळात नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार आणि भजनी मंडळे आपली सेवा सादर करणार आहेत. पंचक्रोशीतील तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनाम सप्ताहाचा आनंद घेणार आहेत.
गावात सध्या सण-उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून, तरुणाई व ग्रामस्थ मंडळींनी सप्ताहस्थळी जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्व भाविकांनी या आठ दिवसांच्या हरिनाम सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे महंत दत्तगिरी महाराज व दाढ खुर्द पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आवाहन केले आहे.
0 Comments