दिलीप शिंदे
सोयगाव दि.२०- सोयगाव तालुक्यातील घोसला येथे सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण होऊन मोठा फटका बसला. यात शेतीचे मोठे नुकसान झाले, पुरात अनेकांचे संसार वाहून गेले. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त तसेच गरजू कुटुंबांनाही दिवाळी हा आनंदाचा सण साजरा करता यावा, यासाठी मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे व कार्यकर्त्यांनी माणुसकीची साद दिली आहे.
मराठा प्रतिष्ठानच्या वतीने दि.१९ रविवार रात्री दहा वाजेपर्यंत पुरबाधित व गरीब कुटुंबांना दिवाळीनिमित्त जीवनावश्यक किराणा साहित्याच्या किटचे वाटप केले. तेल, साखर, डाळी, फराळाचे साहित्य आणि इतर गरजेच्या वस्तू असलेल्या या किटमुळे घोसला गावांतील कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या आणि आर्थिक परिस्थितीमुळे सण साजरा करू न शकणाऱ्या नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत चालवलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. यामुळे त्यांची यंदाची दिवाळी उत्साहाने व समाधानाने साजरी होणार आहे.
- घोसला गावात ५२९ कुटुंबांना किराणा किट-
घोसला येथे मराठा प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब गरजू ५२९ कुटुंबांना डोअर टू डोअर किराणा किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी मराठा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे, जिल्हाध्यक्ष विजय काळे, माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, लक्ष्मण पाटील,भरत पगारे,गणेश गवळी,समाधान गव्हांडे,ज्ञानेश्वर युवरे,सरपंच गणेश माळी,संदीप बावसकर,आदींसह मराठा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता.मराठा प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते व सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.येथील नदीकाठच्या शेतात पाणी शिरून पिकांसह शेती खरडून पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. यामुळे दिवाळीचा सणकसा साजरा करायचा? असा प्रश्न या
पूरग्रस्त कुटुंबांपुढे होता. त्यामुळे मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान गव्हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.
0 Comments