तालुक्यातील वाकडी गावात जल जीवन योजनेचे काम निकृष्ट, अभियंता व ठेकेदाराची मनमानी,ग्रामस्थ आक्रमक--



दिलीप शिंदे
सोयगाव दि.२९- सोयगाव तालुक्यातील वाकडी गावात पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत १०१.३२ लक्ष रुपये खर्चून जल जीवन मिशनच्या हर घर जल योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण असल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. उप अभियंता तथा शाखा अभियंता जी. ए.जंजाळ हे योजनेचे  काम सुरू झाल्यापासून गावात फिरकलेच नाही तर ठेका घेतलेल्या रॉकलाईन कन्स्ट्रक्शन इस्टिमेट नुसार काम केले नाही व अपूर्ण काम ठेवले असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 अभियंता जी. ए.जंजाळ व ठेकेदार यांच्याशी जल जीवनच्या काम संदर्भात भ्रमणध्वनीद्वारे ग्रामस्थांनी संपर्क साधला असता, आमच कुणीही काही करू शकत नाही.बिले कशी काढायची ते आम्हाला माहीत आहे, तुम्ही शिकवू नका,कोणत्या आमदार,खासदाराकडे तक्रार करायची करा अशी असभ्य भाषा वापरून जंजाळ व ठेकेदार दादागिरी करीत असल्याचे वाकडी ग्रामस्थांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. जल जीवन चे काम इस्टिमेट नुसार करण्यात यावे असा ठराव ग्राम सभेत मंजूर करण्यात आला आहे.
      याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यातील वाकडी येथे पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत १०१.३२ लक्ष रुपये खर्च करून जल जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे.या कामाचा ठेका रॉकलाईन कन्स्ट्रक्शन ने घेतला आहे. रॉकलाईन कन्स्ट्रक्शन ने इस्टिमेट नुसार काम केलेले नाही. काम सुरू असताना पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद उप अभियंता तथा शाखा अभियंता जी. ए.जंजाळ हे गावात फिरकलेच नसल्याने ठेकेदार व जंजाळ यांचे लागेबांधे असल्याने काम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले आहे. जल जीवनाच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. दि.१७ सप्टेंबर रोजी ग्राम सभेत जल जीवन चे काम इस्टिमेट नुसार करण्यात यावे, अपूर्ण असलेले काम ही इस्टिमेट नुसार करण्यात यावे असा ठराव क्रमांक ६ सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. कामा संदर्भात जंजाळ व ठेकेदार यांच्याशी ग्रामस्थ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत असता जंजाळ व ठेकेदार असभ्य भाषेचा वापर करीत तुम्हाला मंत्री, आमदार,खासदार यांच्याकडे तक्रार करायची खुशाल करा,त्यांचेच हात काळे आहेत, आमच कोण काय करणार असे बोलत असल्याचे ग्रामस्थानी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. वाकडी ग्रामस्थांच्या समस्येची कोण दखल घेणार व जंजाळ व ठेकेदार यांच्यावर कोण कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर उप अभियंता तथा शाखा अभियंता यांच्या अकार्यक्षम पणामुळे जल जीवन मिशनच्या हर घर जल योजनेचा बट्ट्याबोळ झाला असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे ग्रामस्थानी तक्रार केली आहे.गावाला न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.

Post a Comment

0 Comments