श्रीरामपूरच्या क्रीडांगणावर रोल बॉलचा जल्लोष...महाराष्ट्राच्या मातीतून घडलेला जगभर गाजलेला रोल बॉल – राजू दाभाडे.



 टाकळीभान प्रतिनिधी-दिलीप लोखंडे 


अहिल्यानगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा मानला जातो. तब्बल १४ तालुके असलेल्या या जिल्ह्यात क्रीडाक्षेत्रात प्रचंड क्षमता दडलेली आहे. या जिल्ह्यातील युवकांनी विविध खेळांमध्ये आपली ओळख निर्माण केली असली तरी गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्राच्या मातीतील एक खेळ असा आहे, ज्याने केवळ राज्यातच नव्हे तर जगभरात आपला ठसा उमटवला आहे. हा खेळ म्हणजे रोल बॉल!
रोल बॉलचा उगम पुण्यात झाला. या खेळाची निर्मिती पुण्यातील राजू दाभाडे यांनी केली.

 त्यामुळे त्यांना जगभरात रोल बॉलचे जनक म्हणून सन्मानाने ओळखले जाते. स्केटिंगच्या चाकांवर खेळला जाणारा आणि बास्केटबॉलच्या धाटणीचा हा खेळ अत्यंत गतिमान असून पाहणाऱ्यांना अक्षरशः रोमांचित करून टाकतो. आज या खेळाला वीस वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. या काळात रोल बॉलने आंतरराष्ट्रीय स्तरावर एवढी लोकप्रियता मिळवली आहे की जगातील दहा सर्वाधिक गतिमान खेळांमध्ये या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर याचे वर्ल्ड कप स्पर्धाही यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्या आहेत.
श्रीरामपूर येथे नुकतीच २२ वी राज्यस्तरीय पुरुष व महिला रोल बॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेदरम्यान उपस्थितांना संबोधित करताना राजू दाभाडे यांनी सांगितले की अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असून यात १४ तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्यात रोल बॉलचा खेळ सुरू झाला पाहिजे. गावागावातील मुलांनी या खेळाशी जुळून घेतले, शाळा आणि महाविद्यालयांतून संघ पुढे आले तर राज्यात रोल बॉलचा ठसा अधिक ठळकपणे उमटेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्पर्धेच्या निमित्ताने दाभाडे यांचा सत्कार पुणे विभाग व्हॉलीबॉल सचिव नितीन बलराज,अरुण जंजिरे,सोमनाथ घुगे, अनिल भानगडे, प्रसन्ना बिंगी, आनंद पटेकर,क्रीडा प्रशिक्षक गौरव डेंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थित जितेंद्र लक्ष्मणराव भोपळे,  संचालक,नगर रचना,महाराष्ट्र राज्य,पुणे आणि विजय कुमार वाघमोडे,सहसंचालक,नगररचना,पुणे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
 रोल बॉल या खेळाचे वैशिष्ट्य इतके विलक्षण आहे की तो केवळ शारीरिक तंदुरुस्तीच वाढवत नाही, तर गती, कौशल्य, शिस्त आणि संघभावनेची खरी शिकवण देतो. खेळाडूंच्या शरीराला चपळता, मनाला आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्तीला नवा आविष्कार मिळवून देणारा हा खेळ आज संपूर्ण जगात महाराष्ट्राचा मान उंचावतो आहे.श्रीरामपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे जिल्ह्यातील क्रीडा वातावरणात प्रचंड उत्साह संचारला. खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि आयोजक यांच्या परिश्रमाने हा क्रीडासोहळा संस्मरणीय ठरला. महाराष्ट्राच्या मातीतील या खेळाला मिळालेली जागतिक दखल आणि दाभाडे यांच्या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थित सर्वांच्या मनात अभिमानाची भावना दाटून आली.

Post a Comment

0 Comments