नवरात्रीत नऊ संख्येला मोठे अध्यात्मिक महत्त्व --ह भ प संजयजी महाराज जगताप



शिर्डी (राजकुमार गडकरी)-- सध्या शारदीय नवरात्र उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. या नवरात्रीला अध्यात्मिक क्षेत्रात मोठे महत्त्व आहे. तसेच नऊ संख्येलाही मोठे महत्त्व असे हभप संजयजी महाराज जगताप (भऊरकर) यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की,नवरात्रीमध्ये विविध प्रकाराने धार्मिक विधी पूजा केली.
 जाते.नवरात्रीला पहिल्या दिवशी विधिवत घटाची मोठ्या श्रद्धेने स्थापना केली जाते.  नवरात्रीच्या या  घटाभोवती  पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं असतात. त्यामध्ये साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी असते.
दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार आहेत. शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री होय.तर
दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं  आहेत.ती अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका होय.
महाराष्ट्रातली देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं  आहेत. वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई), श्री एकवीरादेवी (कार्ला). यांना देवी मंदिरांची महती सर्व दूर पसरली आहे. तसेच नवरात्रींचे ‘वेगवेगळे नऊ’ रंग   शुभ मानले जातात.लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा हे ते येथे नवरंग आहेत.
नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा  आहेत.रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश हे होय.
नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं आहेत.ती  माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी हे आहेत.नऊ’ प्रकारची दानं या नवरात्रीत केले जाते. अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान हे होय.
नवविध भक्तीचे ‘नऊ’ प्रकार आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन होय.
प्रसिद्ध ‘नऊ’ नाग आहेत. शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ हे नऊ नाग होय.
समस्त मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड  असून ते म्हणजे भरतखंड (पूर्व), केतुमालखंड (पश्चिम), रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर), वृत्तखंड (आग्नेय), द्रव्यमालखंड (नैऋत्य), हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य), सुवर्णखंड (मध्य) होय.
मानवी देहांतर्गत असलेले ‘नऊ’ कोश म्हणजे अन्नमय, शब्दमय, प्राणमय , आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय , आकाशमय, विज्ञानमय होय.
मानवी मनाचे ‘नऊ’ गुणधर्म आहेत. धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार, क्षमा, स्मरण, चांचल्य असून
मानवी शरीराच्या ‘नऊ’ अवस्था आहेत. मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था, गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व, मृत्यू होय.
नाथांच्या नीतीशास्त्रातली ‘नऊ’ रहस्यं : आयुष्य, वित्त, गृहछिद्र, मैथून, मंत्र, औषध, दान, मान, अपमान हे होय. त्यामुळे नवरात्री आणि नऊ संख्या यांना मोठा आध्यात्मिक आधार असून नऊ ही संख्या नवरात्रीत महत्त्वाची ठरत आहे. असे मत प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर) यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments