दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी-माऊली प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट श्रीरामपूर संचलित प्राईड अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांची आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी वेशात हातात टाळ, गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळी अष्टगंध, खांद्यावर भगवी पताका, मुलींच्या डोक्यावर तुळशी कलश व मुखी हरीनाम घेत खोकर येथील वातावरण भक्तिमय झाले होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल गजराने खोकर नगरी दुमदुमली.
वृक्ष दिंडीचे खोकर गावात पदार्पण झाले तेव्हा सर्वप्रथम खोकर ग्रामपंचायत व दिगंबर भोंडगे यांच्यावतीने विठ्ठल रुख्मिणी पूजनाने दिंडीचे स्वागत केले. त्यानंतर दिंडीचे पहिले रिंगण हे गावातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरासमोर झाले. त्यानंतर गावपरिक्रमा करून दिंडी गावातील राम मंदिरासमोर दुसऱ्या रिंगणासाठी आली. याठिकाणी विठ्ठल रुख्मिणी पूजन होऊन आरती करण्यात आली.
निवृत्ती,ज्ञानदेव, सोपन, मुक्ताबाई, संत गोरा कुंभार, जनाबाई यांच्या वेशात विद्यार्थ्यांनी रूपे साकारली. दिंडीतील विद्यार्थी हातामध्ये असणारे फलक पर्यावरण रक्षण, वृक्ष लागवड महत्व, झाडांचे आपल्या जीवनातील स्थान यांचे महत्व पटवून देत होते. प्राईड अॅकेडमीमध्ये चार भाषा शिकविल्या जातात. विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषेत खोकर वासियांचे स्वागत केले.
प्राईड अॅकेडमीच्या प्राचार्या प्रीती गोटे यांनी दिंडीच्या, शाळेच्या व महाविद्यालाबाबत माहिती विषद केली. दरवर्षी प्राईड अॅकेडमी कार्यक्षेत्रातील गावात दिंडीच्या माध्यमातून फक्त अभ्यासक्रमच शिकविला जात नाही तर धार्मिक संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत यासाठी विविध सण उत्साहात विद्यालयात साजरे केले जातात.
त्याप्रसंगी प्राईड अॅकेडमीच्या प्रवर्तक व पं. स.मा.सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे,संस्थापक माऊली मुरकुटे, गावच्या सरपंच आशाबाई चक्रनारायण, मा.सरपंच तुकाराम सलालकर, मा. व्हा. चेअरमन बाबासाहेब काळे, शिवसेना नेते सदाशिव पटारे, ज्ञानेश्वर काळे, उत्तम पुंड, शंकर शेरकर, ताजखा पठाण, आयाज पठाण, आमीन सय्यद, बनेखा पठाण, खाजाभाई शेख, अस्लम पठाण, फिरोझ शेख, कादर सय्यद, लालाभाई पठाण, इम्रान पठाण, नंदुमामा चव्हाण, लक्ष्मणराव चव्हाण, बाबा शेख, महेश पटारे, मयूर गव्हाणे, प्रदीप चक्रनारायण, अंतोज चक्रनारायण, सतीश चव्हाण, ज्ञानदेव पवार,प्रकाश पवार,रावसाहेब चक्रणारायण, नंदकुमार चव्हाण, दत्तागुरु जोशी,दादासाहेब चक्रणारायण,जावेद पठाण,आलिम पठाण,दिगंबर भोंडगे, आदी मान्यवर उपस्थित होते..
रिंगण सोहळ्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांनी दिंडीतील विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतले. चांदतारा यंग सर्कल मुस्लीम समाज मंडळ यांच्यावतीने विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप केले. मार्केट कमिटी संचालक राजूभाऊ चक्रनारायण यांनी विद्यार्थ्यांना केळी वाटप केले, तसेच युवा उद्योजक रामेश्वर उंदरे यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना वेफर्स पाकिटे देण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर दिंडी सोहळ्यासाठी प्राचार्या, शिक्षक व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमांची सांगता ही गीतेच्या पंधरावा अध्यायाने व पसायदानाने झाली. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. शाळेचे उपप्राचार्य प्रदीप गोराणे यांनी सर्व उपस्थित मान्यवर व पालकांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
0 Comments