कैलास शेळके यांना जिल्हास्तरीय गणित गुणवंत अध्यापक पुरस्कार जाहीर



लोहगाव (वार्ताहर): अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळ मार्फत दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत गणित अध्यापक पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या वारी तालुका कोपरगाव येथील श्री रामेश्वर विद्यालय येथे कार्यरत उपशिक्षक कैलास दत्तात्रय शेळके यांना जाहीर झाला आहे. 

या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. ३ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे. कैलास शेळके हे गेल्या बारा वर्षापासून कोपरगाव तालुक्यातील वारी येथील श्री रामेश्वर विद्यालयात गणित विज्ञान अध्यापनाचे कार्य करत आहे त्यांनी घडवलेले अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदांपर्यंत पोहोचलेले आहे. त्यांनी तालुका पातळीवर गणित विज्ञान तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उत्तम कामकाज केलेले आहे. कैलास शेळके यांनी अत्यंत प्रामाणिक अभ्यासू आणि चिकाटीने अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केलेले आहे. शासकीय पातळीवर तसेच संस्था पातळीवर गणित विज्ञान विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांचा परिचय सर्वश्रुत आहे.
त्याचप्रमाणे संस्था पातळीवर तंत्रस्नेही शिक्षक तज्ज्ञ विषयी मार्गदर्शक करिअर मार्गदर्शक व समुपदेशक म्हणून उल्लेखनीय कामकाज सुरू आहे. कैलास शेळके यांना नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हास्तरीय पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा पुरस्कार व्यक्ती विशेष नसून आपण प्रामाणिकपणे करत असलेल्या कार्याचा सन्मान असतो, त्यामुळे प्रत्येक विषय शिक्षकाने विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाणे अध्यापन करावे, सक्षम आणि गुणवंत विद्यार्थी हेच आदर्श शिक्षकाची शिदोरी असते. सातत्याने मनापासून केलेल्या चांगल्या कामाची नक्कीच दखल घेतली जाते, असे मत  कैलास शेळके यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments