शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथील श्री साईबाबांच्या द्वारकामाईतील श्री साईबाबांच्या पवित्र शिळेजवळ दोन लाख रुपयांचे सोन्याचं घड्याळ साईसंस्थानच्या सुरक्षा रक्षकांना सापडले होते. घड्याळाच्या डायलवर ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरियाची प्रतिमा आणि Victoria Empress असे लिहिलेले असून, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपल्या सुरक्षा अधिकाऱ्याकडे हे घड्याळ जमा केलं. घड्याळ कोणाच्या हातून पडलं का? कोणीतरी श्रद्धेने साईबाबांना अर्पण केलंय?
हे मात्र अद्याप समजू शकले नसले तरी संस्थानच्या कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.
श्री.साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात. साईंच्या समाधीच्या दर्शनानंतर साईबाबांनी आपले संपूर्ण जीवन फकीर अवस्थेत व्यतीत केलेल्या द्वारकामाईतही भाविक दर्शनासाठी जातात. साईबाबा जिथे आपल्या हयातीत बसायचे त्या द्वारकामाईतील पवित्र शिळेजवळ साई संस्थानच्या सुरक्षा विभागातील महिला सुरक्षारक्षक रंजना कुंभार आणि रशीद शेख हे दोन कर्मचारी ड्युटीवर कार्यरत असताना पिवळ्या रंगाचे एक घड्याळ आढळून आल्यानंतर प्रामाणिकपणे त्यांनी ते घड्याळ सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्याकडे जमा केलं.
या घडाळाच्या डायलवर ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरियाची प्रतिमा आणि व्हिक्टोरिया इंप्रेस असं लिहिलेलं असल्याने ते घड्याळ सोन्याचं असल्याची शक्यता आहे. सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी आणि सुरक्षा विभागातील सुदाम कोते यांनी त्या घड्याळाची सोनाराकडून तपासणी केली असता ते घड्याळ लेडीज असून, चक्क 22 कॅरेट सोन्याचे आहे, ज्याची किंमत तब्बल दोन लाख असल्याचं समोर आलं. हे घड्याळं खास बनवून घेतले गेलेले असल्याने त्याची किंमत दोन लाखांहून अधिक ही असू शकतो, असे सोनाराकडून सांगण्यात आलं. हे सोन्याचे घड्याळ प्रामाणिकपणे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संस्थान कडे दिल. या प्रामाणिक पणाबद्दल या सुरक्षा महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केला. यावेळी सुरक्षा विभागातील सुदाम कोतेही उपस्थित होते.
0 Comments