लोहगाव (वार्ताहर): "येत्या शैक्षणिक वर्षापासून कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, आयवोटी, रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिग यासारख्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला जागतिक दर्जाच्या विषयांचे शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्था सज्ज आहे", असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी IAS (Rtd.) यांनी केले.
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज सातारा येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेत केलेले महत्वपूर्ण बदल सांगताना ते म्हणाले, " यापुढे रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाळेच्या इमारतीचा रंगदेखील एकसारखाच असेल. रंगाचा आता 'ब्रँड' असेल. रयत शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक शिक्षकांना अद्ययावत ज्ञानाची माहिती होण्यासाठी 'रयत' मासिक सुरु करण्यात येत आहे. याच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन येत्या ९ मे रोजी होईल. नवनियुक्त मुख्याध्यापक तसेच क्लार्क यांना अकाउंट लेखणाच्या मार्गदर्शनासाठी पुस्तिका तयार करण्यात आली आहे. शाळांच्या विकासात माजी विद्यार्थीदेखील योगदान देत असतात. शाळेच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचे योगदान घेण्याच्या दृष्टीने माजी विद्यार्थी संघ रजिस्ट्रेशन करण्यात येईल."
कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, विभागीय अधिकारी, सहाय्यक विभागीय अधिकारी तसेच रयत शिक्षण संस्थेच्या सुमारे सहाशेहून अधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते.
0 Comments