दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी- हयातीचे दाखले, आधार क्रमांक, बँक पासबुकच्या झेरॉक्स देऊन आधार सिडिंग केले तरी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत नाही. हे रखडलेले अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी महाराष्ट्र साऊ एकल महिला समितीने केली आहे.
समितीचे राज्य समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे यांनी प्रलंबित अनुदानाबाबत श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
महाराष्ट्र सरकारने थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.) योजनेद्वारे संजय गांधी निराधार योजनेसह विविध सामाजिक अर्थ सहाय्य योजनांचा लाभ फेब्रुवारी २०२५ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना हयातीचे दाखले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसल्याबाबत महिला व बालविकास प्रकल्पाधिकाऱ्यांचे पत्र, लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र, आधार क्रमांक, बँक पासबुकच्या झेरॉक्स सादर करण्यास तहसीलमधील संजय गांधी निराधार अनुदान योजना विभागातून सांगितले होते. अगोदरच आधार लिंक असलेले बँक खाते आधार सिडिंग करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर केली. आता कागदपत्रे सादर करून पाच ते सहा महिने होऊन गेली आहेत. काही लाभार्थ्यांनी एकदा नाही, तर अनेकदा कागदपत्रे जमा केली. पण गेल्या काही महिन्यांपासून अनुदान बँक खात्यात जमा होत नसल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत, याकडे मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे व बाळासाहेब जपे यांनी तहसीलदार वाघ यांचे लक्ष वेधले. त्यांनी याबाबत तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना संजय गांधी निराधार योजना अनुदान विभागाचे नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर यांना दिल्या आहेत.
----------------------
संजय गांधी निराधार योजना व इतर सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे अनुदान जमा होत नाही, अशा लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट करून बॅंक खाते आधार सिडिंग करून घेणे आवश्यक आहे. हयातीचा दाखला, अपडेट आधार व पासबुकची झेरॉक्स तहसील कार्यालयात जमा केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करणे सोपे होईल.
----मिलिंदकुमार साळवे.
सदस्य मिशन वात्सल्य शासकीय समिती.
----------------------------
बँक खाते आधार सिडिंग करून हयातीचा दाखला, बँक पासबुक व आधारची झेरॉक्स, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसल्याचे बालविकास प्रकल्पाधिकाऱ्यांचे पत्र व स्वयंघोषणापत्र अशी कागदपत्रे १ जानेवारीस जमा केली आहेत. त्याला चार महिने झाले. आठ महिन्यांपासून माझे अनुदान रखडले आहे.
---मयुरी सूर्यकांत परदेशी, लाभार्थी, श्रीरामपूर.
0 Comments