राजकुमार गडकरी
श्रीक्षेत्र सोरटी सोमनाथ देशामध्ये प्रसिद्ध असे बारा ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी गुजरात राज्यातील सौराष्ट्राच्या वेरावळ बंदरातील आणि प्रभासपट्टण या ठिकाणचे भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे. अशा या श्री सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात.
अरबी समुद्रकिनारी असणाऱ्या या भव्य दिव्य मंदिर व मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आकर्षक असा आहे. या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा महिमा स्कंदपुराणात तसेच महाभारतात आणि श्रीमद भागवत यामध्ये आहे. सुमारे 155 फूट उंच असणाऱ्या या मंदिराचा जिर्णोद्धार सरदार वल्लभभाई पटेल यांनी सन 1955 मध्ये केला.
साधारणपणे अकराव्या शतकाच्या दरम्यानच्या काळामध्ये हे मंदिर श्रीमंत होते पण हे मंदिर मोहम्मद गजनीने उध्वस्त केले. त्यानंतर १२९७ तसेच १३९४ मध्ये आणि नंतर १७०६ मध्ये औरंगजेब याने मंदिराचा नाश केला. त्यानंतर १९५० पर्यंत मंदिर पुन्हा बांधले गेले नाही. सोमनाथ मंदिर १७ वेळा नष्ट झाले आणि प्रत्येक वेळी ते पुन्हा बांधले गेले होते. असे सांगितले जाते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांनी सध्याच्या या इमारतीच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली आणि एक डिसेंबर १९५५ रोजी भारताचे त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्राला समर्पित केले. हे मंदिर गुजरातमधील दुसरे प्रमुख पुरातत्त्व क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र आहे. हे वेरावळ रेल्वे जंक्शनच्या आग्नेयेस सुमारे ०७ किलोमीटर आहे. वेरावल रेल्वे स्टेशन हुन बस ,रिक्षा ,सोमनाथ मंदिराकडे येण्यासाठी मिळतात.सोमनाथ नावाचा अर्थ सोमनाथ म्हणजे सोमचा देव, नाथ. सोम म्हणजे चंद्र आणि भगवान शंकराला आपला नाथ स्वामी मानून चंद्राने या ठिकाणी तपश्चर्या केली. म्हणून या ज्योतिर्लिंगाला “सोमनाथ” असे नाव पडले. असे सांगितले जाते.
मंदिराच्या शिखरावरील कलशाचे वजन सुमारे दहा टन असून ध्वज २७ फूट उंच आणि परीघ एक फूट आहे. या मंदिराचे प्रवेशद्वार कलात्मक पद्धतीने बांधण्यात आले आहे. हे मंदिर सभा मंडप, गर्भगृह आणि नाट्यमंडप अशा तीन भागात बांधले गेले आहे.
सध्याची या मंदिराची रचना ही १९५१ ते १९५५ या पाच वर्षांमध्ये पूर्ण झाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान शंकरांचे शिवलिंग असून या मंदिराचा गाभारा हा पूर्णपणे सोन्याचा आहे. या ठिकाणी भगवान शंकराची नित्यनेमाने पूजा केली जाते. या मंदिराचा कळस सोन्याचा आहे.
या मंदिराला वाचवण्यासाठी,व ज्या व्यक्तींनी मंदिर कार्यासाठी योगदान दिले होते, त्यांचे पुतळे या मंदिर परिसरात दिसून येतात. मंदिराच्या समोरच सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा आहे . मंदिराच्या बाहेरील भागात अहिल्याबाई होळकर यांनी स्थापन केलेले पारडी विनायक, नवदुर्गा, अहिल्येश्वर, अन्नपूर्णा, गणपती, काशी विश्वनाथ, हनुमानजी यांची छोटी छोटी मंदिरे आहेत.या परिसरामध्ये एक अतिशय सुंदर असे गणपतीचे मंदिर आहे आणि उत्तरेकडे अघोरलिंगाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या मंदिरात गौरीकुंड नावाचा तलाव आहे आणि या तलावाजवळ शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे. या मंदिराच्या आवारात माता अहिल्याबाई आणि महाकाली यांचे अतिशय सुंदर आणि विशाल असे मंदिर आहे. श्री सोमनाथाचे दर्शन झाल्यानंतर येथेही भाविक दर्शन घेत असतात. समोरच ट्रस्टचे प्रसादालय आहे.
या मंदिराच्या जवळपास दहा किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये अनेक मंदिरे आहेत .तसेच हिरण्य, सरस्वती आणि कपिला यांचा संगम म्हणजेच त्रिवेणी संगम आहे.या मंदिरामध्ये पार्वती, लक्ष्मी, गंगा, सरस्वती, नंदी यांच्या मूर्ती देखील विराजमान आहेत.शहराच्या वेशीपासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर प्राची त्रिवेणी संगम दिसून येतो. वाटेत ब्रह्मकुंड नावाची पायरी विहीर लागते. ब्रह्मकुंड नावाचे तीर्थक्षेत्र आणि ब्रह्मेश्वराचे शिवमंदिर देखील या ठिकाणी आहे. पुढे गेल्यानंतर आदिप्रभा आणि जलप्रभा नावाची दोन कुंडे दिसून येतात. शहराच्या पूर्व दिशेला हिरण्य, सरस्वती आणि कपिला नावाच्या तीन नद्या समुद्राला मिळतात. या तिन्ही नद्यांच्या संगमामुळे या नदीला “प्राची त्रिवेणी संगम ” असे म्हटले जाते. आधी कपिला ही सरस्वतीशी सामील होते. नंतर सरस्वती हिरण्यशी जोडली जाते. त्यानंतर हिरण्य सागरात विलीन होते. या संगमापासून थोड्या अंतरावर सूर्यदेवाचे देखील मंदिर आहे. चालत गेल्यावर एका गुहेत हिंगलाज भवानी आणि महादेव सिद्धनाथाचे मंदिर दिसते. तसेच
वेरावळ रेल्वे स्थानकापासून सोमनाथ मंदिराकडे जाताना समुद्राच्या किनारी भालकातीर्थ आहे. या तीर्थक्षेत्रात शशीभूषण नावाच्या महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. या भालकातीर्थाच्या पश्चिम दिशेला चंद्रभागा तीर्थ आहे. या तीर्थक्षेत्रात कालिकेश्वराचे महादेवाचे स्थान आहे. बाणतीर्थपासून जवळपास पाच किलोमीटरच्या अंतरावर भालूपुर गावाजवळ भालका तीर्थ आहे.याच्या जवळच भालकुंड आणि पद्मकुंड असे दोन तलाव दिसून येतात. पिंपळाच्या झाडाखाली हे भालेश्वराचे भगवान शंकरांचे स्थान आहे. म्हणून या झाडाला मोक्षपिंपळ असे देखील म्हटले जाते. या पिंपळाच्या झाडाखाली श्रीकृष्णाच्या पायावर जरा नावाच्या शिकाऱ्याने बाण मारला. त्याच्या पायातील बाण काढून या भालकुंडमध्ये टाकण्यात आल्याचे देखील सांगितले जाते. येथे श्रीकृष्णाने आपला मानवी देह सोडून ते स्वर्गामध्ये परत गेले .असे सांगितले जाते.हा पिंपळ येथे मंदिरात दिसतो. सोरटी सोमनाथ येथील मंदिर परिसरात बारा ज्योतिर्लिंग स्थापित केलेले आहे.समोर वटवृक्ष आहे.रात्री आठ ते नऊ या वेळेमध्ये लाईट शो होतो. रंगीबेरंगी अशा लेसर लाईट शो मोठा आकर्षक आहे.
हा शो सोमनाथ आणि भालका तीर्थाच्या ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टी त्यातून प्रदर्शित करतो साधारणपणे एक तासाचा हा लाईट शो असतो. मंदिरा बाहेरच मोबाईल पर्स कॅमेरे ठेवण्याची तसेच चप्पल स्टॅन्ड ची व्यवस्था आहे. येथे वर्षभर भाविक दर्शनासाठी येत असतात. रमणीय समुद्रकिनारा, सुंदर व आकर्षक मंदिर असल्यामुळे येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. शंभो भोलेनाथाचे दर्शन झाल्यानंतर खरोखरच मनाला समाधान वाटते.व सर्वजण येथे दर्शनानंतर आत्मिक समाधानाचा सुस्कारा सोडल्याशिवाय राहत नाही. येथील ज्योतिर्लिंग व परिसरात अनेक मंदिर आहेत. संपूर्ण एक दिवस येथे दर्शन व साईट सीन साठी लागतो.येथे अनेक आश्रम ,धर्मशाळा हॉटेल लॉज आहेत. येथून दिव बेटही जवळ आहे.उन्हाळा असूनही येथे गर्दी होते.
0 Comments