रवी गाढे, महेश कोल्हे यांची कबड्डी सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण



टाकळीभान प्रतिनिधी:- टाकळीभान येथील आझाद क्रीडा मंडळाचे प्रमुख प्रशिक्षक रवी गाढे आणि नामवंत कबड्डीपटू महेश कोल्हे यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, बेंगळुरू येथे आयोजित सहा आठवड्यांचा कबड्डी सर्टिफिकेट कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

      या कोर्समध्ये आधुनिक प्रशिक्षण तंत्र, खेळातील रणनीती, शारीरिक तंदुरुस्ती,आहार नियोजन, मानसिक तयारी तसेच खेळाडू व्यवस्थापन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.देशभरातील अनेक प्रशिक्षक आणि खेळाडू या अभ्यासक्रमात सहभागी झाले होते.

रवी गाढे आणि महेश कोल्हे यांनी या कोर्समध्ये विशेष कामगिरी केली असून, दोघांनाही संस्थेच्या वतीने अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अर्जुन पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक भास्करन सर यांचे दोघांनाही मार्गदर्शन लाभले.
     रवी गाढे हे आझाद क्रीडा मंडळ, टाकळीभान येथून कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कबड्डीपटूंनी प्रो कबड्डी लीगमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना संधी देण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
महेश कोल्हे हे देखील याच मंडळाशी संबंधित असून, प्रशिक्षक म्हणून त्यांची वाटचाल अधिक बळकट होत आहे. त्यांच्या यशाबद्दल श्रीरामपूर तालुका क्रीडा समिती, आझाद क्रीडा मंडळ,सहकारी, मित्रपरिवार व कबड्डी प्रेमी चाहत्यांकडून दोघांचेही अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments