चित्रकूट ( राजकुमार गडकरी) भारतामध्ये अनेक तीर्थस्थाने असून त्यापैकी
चित्रकूट हे देशातील महत्त्वाचे असे तीर्थस्थान
आहे. येथे नेहमी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. आता तर जवळच प्रयागराज येथे महा कुंभमेळा सुरू असल्यामुळे येथे भाविकांची प्रचंड गर्दी आहे.
प्रयागराज महा कुंभामुळे अयोध्या ,काशी येथे जशी भाविकांची मोठी गर्दी होत आहे तसेच चित्र येथेही पाहायला मिळत आहे . चित्रकूट हे
उत्तर प्रदेश राज्याच्या बांदा जिल्ह्यातील पुराणप्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे. ते मध्य रेल्वेच्या झांशी-माणिकपूर फाट्यावरील चित्रकूट स्थानकापासून सुमारे ६ किमी. व कर्वी स्थानकापासून अंदाजे ८ किमी अंतरावर आहे. दक्षिण भारतातून येणारे भाविक माणिकपूर रेल्वे स्टेशनला उतरून चित्रकुटला येऊ शकतात.
कर्वीहून प्रवासी वाहने मिळतात. चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी आहे. येथे अत्री ऋषींचा आणि वाल्मीकींचाही आश्रम आणि विष्णू, चंद्र, दत्तात्रेय इत्यादींच्या निवासामुळे तसेच दुर्वास, नलराजा, धर्मराजा इत्यादींच्या तपाचरणामुळे येथील परिसर अधिकच पवित्र मानला जातो .तथापि चित्रकूटाचे विशेष महत्त्व म्हणजे श्रीरामाने वनवासकाळात येथे केलेले वास्तव्य, व मंदाकिनीवरील चोवीस घाटांच्या मालिकेपैकी रामघाटाजवळ श्रीरामाची पर्णकुटी होती, असे मानतात. येथे कामनानाथ (कामदगिरी), सीतारसोई, प्रमोदवन, स्फटिकशिला, गुप्त गोदावरी, जानकीकुंड, भरतकूप, हनुमानधारा, रामशय्या, लक्ष्मणमंदिर आदी पवित्र स्थाने आहेत.
अनेक ठिकाणी प्रभू श्री रामाचे उमटलेले पावलांचे ठसे आहेत .अशी भाविकांची श्रद्धा आहे. अयोध्येचे राज्य सोडून वनवासावेळी याठिकाणी राम, सीता आणि लक्ष्मणाने चित्रकूटाच्या घनदाट जंगलात मुक्काम केला होता, असा उल्लेख पुराणात आहे. येथील वातावरण नैसर्गिक पर्वतरांग, फेसाळत पडणारे धबधबे, नद्या, घनदाट जंगल पशू-पक्षी असे प्रफुल्लीत करणारे हिरवेगार वातावरण याठिकाणी आहे. येथील कामदगिरी याठिकाणी भगवान रामाने वास केला होता त्यामुळे हे धार्मिकस्थळ बनले आहे. याचठिकाणी भरतमिलाप मंदिर आहे. वनवास काळात श्रीराम येथे आल्यानंतर बंधू भरत श्रीरामाला भेटण्यासाठी येथे आले होते व येथे श्रीराम- भरतभेट झाली होती. असे म्हटले जाते. येथे मनोभावे अनेक जण परिक्रमा करताना दिसत होते.
भरत कूप याठिकाणी पवित्रकुंड भरताने बनविले आहे, असे सांगितले जाते. याठिकाणी ठिकठिकाणच्या पवित्र तीर्थस्थळावरील पाणी एकत्रित केले जाते.येथील जानकी कुंड
हे कुंड रामघाटावर आहे. नद्यांचा प्रवाह, हिरवळ असा निसर्ग पहाण्यासारखा आहे.
रामघाटावरून सुमारे 2 किमीच्या अंतरावर असणा-या जानकी कुंडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. रामघाटावरून नावेतूनही जाता येते.येथिल शाप्तिक शिला
मंदाकिनी नदीच्या किनारी आहे.या किना-यापासून काही अंतरावर घनदाट जंगल आहे. येथील दगडांवर असणारे बोटांचे ठसे रामाचे असल्याचे भाविकांची श्रद्धा आहे.
येथील महत्त्वाचे व निसर्गरम्य असे धार्मिक स्थान म्हणजे गुप्त गोदावरी आहे. गोदावरीला दक्षिण गंगा म्हटले जाते. त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी उगम पावते. येथे गुप्त गोदावरी आहे.
डोंगरांच्या मधोमध नैसर्गिक सौंदर्यांमध्ये 'गुप्त गोदावरी' हे स्थान आहे. डोंगरातील गुहांमध्ये राम आणि लक्ष्मणाचा दरबार भरत असे मानण्यात येते. थंडगार निळेश्वर पाणी सतत येथे वाहत असते.येथील आणखी दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे हनुमान धारा होय.
डोंगराच्या टोकावरून एक धबधबा वाहत येतो. याठिकाणी विविध मंदिर आहेत. याठिकाणी दर्शनासाठी भक्तगणांची गर्दी रस्ते येथून चित्रकूटचा विशाल नजारा आपणास पाहता येतो. श्री हनुमानाच्या अंगावर येथे पाणी पडते. येथील नदीवर घाट आहेत. सायंकाळी आरती होते. अनेक आश्रम आहेत. अनेक साधू संत महंत येथे पाहायला मिळतात. संपूर्ण शहरात धार्मिक वातावरण दिसते. सध्या येथे भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक जण येथील मंदाकिनी नदीमध्ये स्नान करतात. पूजा पाठ, आरती करतात. येथे नावेतूनही जल भ्रमण करता येते. चित्रकूट हे शहर नदीच्या किनारी आहे. नदीच्या दुसऱ्या बाजूला मध्यप्रदेश व एका बाजूला उत्तर प्रदेश आहे.सध्या येथे कुंभमेळ्या निमित्ताने भाविक येत आहेत.येथे अनेक तीर्थस्थानांना भेट देत आहे.येथे भव्य यात्रेचे स्वरूप आले आहे.कुंभमेळ्यासाठी जाणारे येणाऱ्या भाविकांसाठी येथेही मदत केंद्रे आहेत. (विशेष लेख राजकुमार गडकरी शिर्डी)
0 Comments