प्रयागराज (राजकुमार गडकरी)
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महाकुंभमेळा सुरू असून हा भारतातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव सोहळा आहे.
आतापर्यंत करोडो भाविकांनी या कुंभ पर्व काळात स्नान केले आहे व सध्याही मोठ्या संख्येने भाविक देश-विदेशातून येथे येत असून येथील साधू मंहतांचे दर्शन व त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करताना दिसत आहेत. हर हर महादेव, हर हर गंगेचा नारा घाटांवर गुंजत आहे.सध्या त्रिवेणी संगम व सर्व घाट आणि या कुंभमेळ्याचा परिसर भाविकांच्या गर्दीने ,विविध साधू संतांच्या आखाड्याने व आखाड्यातील प्रवचन , कथा व धार्मिक कार्यक्रमांनी गजबजून गेल्याचे दिसून येत आहे. येथे शासनाने भाविकांसाठी तसेच साधू संतांसाठी सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. या धार्मिक उत्सवाला कोणतेही निमंत्रण नसताना मोठ्या श्रद्धेने भाविक येथे येत आहेत. बस, रेल्वे, खाजगी प्रवासी वाहतूक यांना मोठी गर्दी असतानाही मोठ्या श्रद्धेने गंगा यमुना व अदृश्य सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी दररोज भाविकांची गर्दी होत आहे.
या महा कुंभमेळ्यात सर्वजण संगम स्नानाचे ध्येय ठेवून येत आहेत. सर्व भेदभाव विसरून येथे भाविक येत आहेत. येथे उचनीच गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही. कोणाच्या डोक्यावर पिशव्या, कोणाच्या खांद्यावर बॅगा, कुणी खांद्यावर लहान मुलाला उचलून घेतलेले , कुणी वयोवृद्धांना मार्गदर्शन करत आहेत तर वेगवेगळ्या सूचना करणारे स्वयंसेवक, नियम व शिस्तीचे पालन करण्यास लावणारे ठिकठिकाणी पोलीस, विविध मार्गदर्शक फलके, ठीक ठिकाणी बॅरिकेट्स, माहिती केंद्रे आरोग्य केंद्रे, गर्दीत कुणी हरवले तर संपर्कासाठी केंद्र, अशा सर्व सोयी सुविधा येथे निर्माण केल्या आहेत. करोडो भाविकांची
गर्दीतही येथील सेवा सुविधा पाहून थक्क झाल्याशिवाय राहत नाही. 144 वर्षानंतर आलेल्या प्रयागराज महाकुंभ मेळ्याचे काही दिवस राहिले आहेत. 26 फेब्रुवारी 2025 ला महा कुंभ पर्व संपणार आहे. तशी वर्षभर त्रिवेणी संगम स्नानासाठी गर्दी राहणार आहेत. मात्र या महा कुंभकालावधीत मोठी भाविकांची गर्दी होत आहे.आज 12 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा शाही स्नान आहे.मोठी गर्दी झाली आहे.तसेच 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला शाही स्नान शेवटचे आहे. या दिवशीही करोडो भाविक येथे येण्याची शक्यता आहे. प्रयागराज शहर सर्वत्र भाविकांनी गजबजून गेले आहे. तसेच येथील कुंभमेळा हा प्रयागराज,व जवळच्या धार्मिक स्थळांच्या शहरासाठी आर्थिक उलाढालीचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. प्रयागराज व परिसरातील अनेक लोक येथे वेगवेगळे व्यवसाय करत आहेत.मुंग्यासारखी प्रवासी वाहने दिसत आहे.वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे.बरेच अंतर पायी चालावे लागत आहे.जनशक्ती व भक्तीचा येथे संगम पाहायला मिळत आहे.हर हर गंगे, हर हर महादेवाचा जयजयकारा होत आहे.(सहयोगि पत्रकार राजकुमार गडकरी शिर्डी)
0 Comments