दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.02- सोयगाव तालुक्यातील गलवाडा(एस) शिवारातील मालकी असलेल्या शेतातून अज्ञातांनी ट्रॅक्टरद्वारे माती चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला होता. या प्रकरणी शेतकरी महिलेने दि.30 गुरुवारी तहसीलदार व सोयगाव पोलीस ठाण्यात लेखी निवेदनाद्वारे कार्यवाहीची मागणी केली आहे.
या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून गौनखनिज माफियांची दबंगगिरी सुरू असल्याने अवैधरीत्या गौनखनिज वाहतुकीचे प्रकार सर्रास वाढत चालले आहे. महसूल प्रशासन अवैधरीत्या गौनखनिज वाहतूक रोखण्यात अपयशी ठरले आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. गौनखनिज माफियांवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावरून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, तापाबाई विठ्ठल करपे रा.रामजीनगर (आमखेडा)ता. सोयगाव यांची गलवाडा (एस) शिवारात गट क्रमांक 102 मध्ये 2 हेक्टर 26 आर शेतजमिनी आहे. यातून अज्ञातांनी ट्रॅक्टरद्वारे शेतातील माती चोरून नेल्याबाबत शेतकरी महिला तापाबाई करपे यांनी तहसीलदार व सोयगाव पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देत चौकशी करून कार्यवाहीची मागणी केली आहे.अवैधरीत्या गौनखनिज उत्खनन करून वाहतूक करणारांची दिवसेंदिवस दबंगगिरी वाढत चालल्याने दिवस रात्र सर्रास गौनखनिज उत्खनन करून वाहतूक सुरू आहे.गौनखनिज विरोधात गेल्या महिन्यात स्वतः तहसीलदार यांनी कार्यवाही केली होती मात्र गौनखनिज भरारी पथकाकडून स्थापन झाले तेंव्हा पासून एकही कार्यवाही झालेली नसल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. सोयगाव तहसिल च्या भरारी पथकाला केंव्हा सूर गवसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.शेतातील माती चोरी गेल्या प्रकरणी तहसिल व सोयगाव पोलीस ठाण्याकडून काय कार्यवाही केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0 Comments