दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि. 17 -- आठवड्याचा पहिल्याच दिवशी दि.17 सोमवारी तहसीलदारांनी दांडी मारली तर चार नायब तहसीलदारांसह 9 कर्मचारी गैरहजर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तहसीलदार यांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने तहसिल चा कारभार अंशकालीन व कोतवालांवर असल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तहसीलदारच कार्यालयात उशिरा येतात त्यामुळे आमच्यावर काय कारवाई करतील अशी चर्चा तहसिल कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तहसिल कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात सकाळी 09:45 वाजता हजर राहणे बंधनकारक असतांना अधिकारी व कर्मचारी मनमानी करीत जेंव्हा वाटेल तेंव्हा येतात व जेंव्हा वाटेल तेंव्हा जातात. तहसीलदार यांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अंकुश राहिलेला नाही.आठवड्याचा पहिला दिवस दि.17 सोमवारी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत नायब तहसीलदार व कर्मचारी तहसिल कार्यालयात आलेले नव्हते मात्र ग्रामीण भागातून तहसील च्या कामासाठी आलेले नागरिक उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे यांनी तहसिल कार्यालयात नायब तहसीलदार व कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने त्यांच्या गैरहजरी टाकून त्यांची वेतन कपात करून कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन दिले. आस्थापना विभागाकडून राजकुमार खेत्रे, आर. डी जाधव,सुरेश आल्हाड, संजय ताले, विजय उमाळकर,महेंद्र पवार, संतोष नवगिरे,संजय नावकर व गोविंद गोफणे यांची हजेरी रजिस्टर वर गैरहजरी लावण्यात आली.तर तहसीलदार मनीषा मेने या गैरहजर होत्या तर नायब तहसीलदार संभाजी देशमुख 11:30, नायब तहसीलदार बहुरे 11:30, नायब तहसीलदार पत्रिके गैरहजर, नायब तहसीलदार काकासाहेब सावळे हे गैरहजर होते.तहसीलदारच वेळेवर येत नसल्याने तहसिल कार्यालयात अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नसल्याने तहसिल कार्यालयात कामासाठी आलेल्या वयोवृद्ध महिला व नागरिकांना मोठा त्रास सहन करीत कामे होत नसल्याने आर्थिक भुदंड सोसत माघारी फिरावे लागत आहे. सोयगाव तालुका हा दुर्लक्षित असून मराठवाड्याची व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची हद्द असून जिल्हाधिकारी यांनी नागरिकांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी तहसिल कार्यालयात बायोमेट्रिक सुरू करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
--तहसीलदार मनीषा मेने यांनी सोयगाव तहसिल कार्यालयाचा पदभार स्वीकारला तेंव्हा पासून दैनंदिन कामकाजासाठी दुपारी 01:00 वाजेनंतर येत असल्याने गोरगरिबांच्या कामावर खीळ बसली आहे. शेतकरी व तहसिल कार्यालयात रेंगाळलेल्या कामासाठी ग्रामीण भागातून वयोवृद्ध महिला व नागरिक सकाळ पासूनच तहसिल कार्यालयात तहसीलदार व अधिकारी यांची देवा सारखी वाट बघत असतात मात्र तहसीलदारांसह अधिकाऱ्यांना या गोष्टीचे गांभीर्य नसल्याने नागरिकांमधून तहसीलदार यांच्या मनमानी येणे -जाणे या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पालकमंत्री तथा समाज कल्याण मंत्री ना.संजय शिरसाट यांनी लक्ष घालावे अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.
(सहयोगी पत्रकार दिलीप शिंदे सोयगाव)
0 Comments