टाकळीभान- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील टेलटँक मधून शेतीच्या पाण्याचे आवर्तन सोडावे या मागणीचे निवेदन १६ चारीवरील लाभधारक शेतकर्यांनी जलसंपदा विभागाचे उपविभागिय अधिकारी कल्हापूरे यांना दिले आहे.
निवेदनात नमुद केले आहे की, टाकळीभान सह परिसरातील विहीरी व कुपनलीकांच्या पाण्याने तळ गाठला असून पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे त्याचा फटका सध्या रब्बी हंगामातील पिकांना बसत आहे. मागील १५ ते २० दिवसापूर्वी शेतीचे आवर्तन सुटले होते. मात्र त्यावेळी शेतकर्यांच्या उसाला तोडी सुरू असल्यामुळे बहुतांश शेतकर्यांनी पाणी घेतले नाही.
चारी नं.१६ वरील शेतकर्यांच्या विहीरी व कुपनलीकेने तळ गाठला असून रब्बी हंगामातील कांदा, गहु, हरबरा, मका आदी पिकांना पाण्याची नितांत गरज आहे मात्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने पाण्या अभावी उभी पिके होरपळून जात असल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे तसेच जनावरांचा चारापिके व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गडद होतांना दिसून येत आहे.
येत्या एक ते दोन दिवसात या पिकांना पाणी न मिळाल्यास शेतकर्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. त्यामुळे लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे उशीरा आवर्तन सोडल्यास उभी पिके हातची जातील व उशीरा सोडलेल्या आवर्तनाचा लाभ शेतकर्यांना होणार नाही व कधीही न भरून होणारे नुकसान होईल. त्यामुळे जलसंपदा विभागाने लवकरात लवकर टाकळीभान टेलटँकमधून शेतीसाठीचे आवर्तन सोडावे अशी मागणी चारी नं.१६ वरील लाभधारक शेतकर्यांनी केली असून आवर्तन न
सोडल्यास रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा
इशारा शेतकर्यांनी निवेदनात दिला आहे.
या निवेदनावर अजित थोरात, भारत भवार, पवन मिरीकर, विलास बोडखे, अमर धुमाळ, तुकाराम कांबळे, बबनराव मगर, अनिल बोडखे, किरण बोडखे, राजेंद्र बोडखे, बाळासाहेब पटारे, चित्रसेन रणनवरे, प्रसाद बोडखे, तुकाराम बोडखे, पाराजी रणनवरे, राहुल वेताळ, द्वारकानाथ बोडखे, सुनिल बोडखे, उमेश त्रिभूवन आदींसह लाभधारक शेतकर्यांच्या सह्या आहे.
0 Comments