शिर्डी (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सध्या महा कुंभमेळा सुरू असून दररोज लाखो भाविक येथे संगम स्नानासाठी येत आहेत. मोठी गर्दी असूनही भाविकांमध्ये शिस्त संयम श्रद्धा दिसून येत आहे.
एकमेकांबद्दल आदर सहानुभूती आपुलकीची भावना आपोआप जागृत होत आहे. येथे कुणी मोठा छोटा नाही श्रीमंत गरीब नाही सर्वजण सारखे आहेत आपण सर्व भारत मातेचे या ईश्वराचे लेकरे आहोत. असे सर्वजण मोठ्या श्रद्धेने समजत आहेत. आणि त्यातूनच एकमेकाबद्दल प्रेम , आदर निर्माण होत आहे. त्यामुळे जरी कुणी ओळखीचा नसला तरी,पर राज्यातला असलातरी किंवा भाषा वेगळी असली तरी या महा कुंभमेळ्यात आल्यानंतर तो आपलाच जवळचा कोणीतरी आहे असा एक भाव प्रत्येकाच्या मनी असतो. त्यामुळे प्रत्येक जण प्रामाणिकपणे येथे फक्त पवित्र मनाने, श्रद्धेने संगम स्नान करण्यासाठी पवित्र गंगा यमुना व गुप्त सरस्वतीचे दर्शन घेण्यासाठी आलेला असतो. प्रत्येक जण येथील साधू संत महंत व प्रत्येक भाविकांमध्ये ईश्वर रूप पाहतो. त्यामुळे प्रत्येकावर मोठा विश्वास आपोआप तयार होत असतो. असे येथे दिसून येत आहे. प्रामाणिकपणाचेही अनेक उदाहरणे येथे दिसत आहेत.
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान, भक्ती आणि धर्माच्या सागरात घडलेली एक प्रेरणादायक घटना म्हणजे महंत आत्माराम गिरी यांच्या शिष्या सौ. आशाताई खंडेराव शिंदे यांचा प्रामाणिकपणाचा आणि सत्याचा आदर्श दाखवणारी घटना घडली आहे.
रोटेगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या असलेल्या आशाताईंना महाकुंभाच्या प्रचंड गर्दीत पाच हजार रुपयांचे पाकीट सापडले. त्या क्षणी, त्यांनी कोणत्याही क्षुल्लक मोहाला बळी न पडता, अत्यंत उदार अंत:करणाने ते पाकीट परत करण्याचा निर्णय घेतला. या कृतीतून त्यांनी केवळ प्रामाणिकपणाचे नव्हे तर मानवी मूल्यांचे उत्तम उदाहरण घालून दिले.महंत आत्माराम गिरी महाराजांनी या कार्याची दखल घेत आशाताईंचे कौतुक केले आणि त्यांना सत्याच्या मार्गावर दृढ राहण्याचा मोलाचा उपदेश केला. महाराजांनी सांगितले की, दान हे केवळ संपत्तीच्या रूपात नसते, तर आपले प्रामाणिक आचरण आणि नैतिकता हे खरे दान आहे, जे समाजाला प्रकाशमान करते.सौ. आशाताईंच्या या कृतीने महाकुंभाच्या पवित्र वातावरणात एक आदर्श निर्माण केला आणि समाजाला सत्य, प्रामाणिकता व धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. अशा घडामोडी केवळ महाकुंभ मेळ्याचे महत्त्व वाढवतातच नाहीत, तर मानवतेचे मूळ अधिष्ठानही दृढ करतात. हे या प्रामाणिकपणाच्या उदाहरणांने दाखवून दिले आहे. या महा कुंभामध्ये अनेक जण असे आहेत की ते येथे येणाऱ्यांची मोठी सेवा करतात. अनेक जण येथे अहोरात्र स्वच्छता करण्यासाठी काम करत आहेत. हे येथे महा कुंभामध्ये पाहायला मिळत आहे.
0 Comments