दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि. 19 - सोयगाव वनपरिक्षेत्रांतर्गत भरदिवसा सर्रास अवैधरीत्या डेरेदार वृक्षांची तोड केली जात असून ट्रॅक्टर व टाटा (608) या वाहनादद्वारे लाकडांची वाहतूक केली जात आहे.
सोशल मिडियाच्या माध्यमातून वनविभागाला माहिती देऊनही कार्यवाही करण्यात येत नसल्याने रक्षकअसलेला वनविभागाच भक्षक असल्याची चर्चा तालुक्यातील रंगली आहे. यामुळे तालुक्यात अवैधरीत्या वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असून वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ याच्या कार्यकाळात दररोज शेकडो झाडांची अवैधरित्या वृक्षांची कत्तल केली जात असल्याने वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव वनपरिक्षेत्र व बनोटी वनपरिमंडळ अंतर्गत तिडका-बनोटी रस्त्यावरील वरठाण गावाजवळ मोठमोठे डेरेदार वृक्षांची अवैधरीत्या तोड करून ठेवलेली लाकडे आहेत परंतु वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी व कर्मचारी आर्थिक हितसंबंधातून कार्यवाही करीत नसल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्या कार्यकाळात दररोज शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे.
लाकूड तस्कर व वनविभाच्या आर्थिक हितसंबंधातून हा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. यामुळेच सोयगाव वनपरिक्षेत्रात सर्वात जास्त अवैध वृक्ष तोडीचे प्रमाण वाढले आहे. कुणाकडेही तक्रार करा कार्यवाही तर दूरच जो पर्यंत लाकडे भरून ट्रॅक्टर व मोठी वाहने सोयगाव हद्दीतून पास होत नाही तोपर्यंत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे फोन बंद असतात चुकून लागलाच तर स्वीकारला जात नाही.स्थानिक पासून ते जिल्हा कार्यालयापर्यंत हितसंबंध जोपासले जात असल्याने लाकूड तस्करांवर कार्यवाही केली जात नाही. तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वृक्षांच्या कत्तली प्रकरणी राज्यपाल, मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे वृक्षप्रेमींनी सांगितले. उपवनसंरक्षक यांच्याकडून चौकशी करून काय कार्यवाही केली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
चौकट- पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण संवर्धक, राज्यकर्ते यांच्याकडून वेळोवेळी वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात येते. वृक्षारोपण व संवर्धनासाठी शासनाकडून जनजागृती साठी शालेय विद्यार्थ्यांची शहरात,गावात वृक्षदिंडी काढली जाते. यातून बहुतेक ठिकाणी विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते वृक्षारोपण करतात.मात्र रक्षक असलेला सोयगाव वनविभागच भक्षकाची भूमिका बजावत असल्याने आणखी किती डेरेदार वृक्षांचा बळी जाणार हे मात्र अनुत्तरित आहे.
0 Comments