श्रीक्षेत्र भऊर ते श्री क्षेत्र त्रंबकेश्वर पायी दिंडी सोहळाचे 17 जानेवारीला होणार प्रस्थान!पायी दिंडी सोहळा आध्यात्मिक, सांस्कृतिक, एकात्मतेचा संगम--ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर)

शिर्डी (प्रतिनिधी)
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री रोकडेश्वर हनुमान महाराज तसेच योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या कृपेने व समर्थ सद्गुरु श्री संत नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि मार्गदर्शक ह भ प संजयजी महाराज जगताप( भऊरकर) व सह मार्गदर्शक प्रमोददादा मुरलीधर  जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर असा पायी दिंडी सोहळा शुक्रवार दिनांक 17 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. 



श्रीक्षेत्र भऊर येथून या पायी दिंडी सोहळ्याला श्री रोकडेश्वर हनुमान महाराज मंदिरापासून पालखी पूजन करून शुक्रवार 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी नऊ वाजता उत्साहात सुरुवात होणार आहे. मजल दरमजल करत व मुक्कामाच्या ठिकाणी प्रवचन कीर्तन हरिपाठ आरती असे धार्मिक कार्यक्रम करत हा दिंडी सोहळा शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी त्रिंबकेश्वर येथे पोहोचणार आहे. त्र्यंबकेश्वर येथील हरी ओम धाब्याच्या पाठीमागे पेट्रोल पंपा शेजारी या पायी दिंडीचा विसावा असणार आहे.येथे शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी सहा ते आठ या कालावधीत हभप 
संजयजी महाराज जगताप यांचे एकादशी निमित्त जाहीर कीर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी नऊ ते अकरा या कालावधीत हभप संजयजी महाराज जगताप यांचे काल्याचे किर्तन होणार असून.


 त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. प्रमोददादा मुरलीधर जगताप हे या महाप्रसादाचे अन्नदाते आहेत. ज्या वारकऱ्यांना या दिंडीत सामील व्हायचे असेल त्यांनी वेळेवर यावे व बिछाना बरोबर घ्यावा. मौल्यवान वस्तू बरोबर घेऊ नयेत. असे प्रसिद्ध  दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर दिंडी सोहळ्या संदर्भात बोलताना प्रसिद्ध कीर्तनकार हभप 
संजयजी महाराज जगताप म्हणाले की ,वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रात खूप मोठा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र पंढरपूर, श्रीक्षेत्र आळंदी ,श्रीक्षेत्र पैठण व श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर असे हे चार धाम मानले जातात. अशा या चार धाम पैकी त्रंबकेश्वर एकधाम असून या ठिकाणी हा पायी दिंडी सोहळा जात आहे. येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू व गुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची संजीवन समाधी आहे. प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी श्री त्रंबकेश्वर हे आद्य ज्योतिर्लिंग आहे. हे आम्हा सर्व वारकऱ्यांचे मोठे भाग्य आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे हजारो छोट्या मोठ्या दिंड्या, लाखो वारकरी पायी येत असतात. आमची ही पायी दिंडी ही अनेक वर्षापासून परंपरेने आम्ही चालू ठेवली आहे. या पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना चहा नाश्ता दुपारचे सायंकाळचे जेवण अनेक दानशूर अन्नदाते व भाविकांकडून केले जाते. साधु संत येती घरा! तोची दिवाळी दसरा!! असे म्हणत अनेक गावागावात भाविक या पायी दिंडीतील वारकऱ्यांना साधुसंत महंत समजून वेगवेगळ्या प्रकाराने सेवा करतात. अशी ही परंपरा महाराष्ट्रात मोठी असून पायी दिंडी सोहळ्याची ही धार्मिक परंपरा ऐतिहासिक ,अध्यात्मिक, सांस्कृतिक व एकतेचा संगम करणारी आहे. अशा या पायी दिंडी वारीत लहान-मोठे गोरगरीब, श्रीमंत, उच नीज सर्व एकसारखे असतात. कोणी छोटा मोठा नसतो.सर्वजण परमेश्वराचे नामस्मरण करत परमेश्वराच्या दर्शनाच्या ओढीने पायी चालत असतो. कोणतीही अभिलाषा किंवा काळजी मनात नसते. परमेश्वराची ओढ हाच एकमेव ध्यास असतो. अशा या पायी दिंडी सोहळ्याचे समाधान, अनुभूती, आनंद हा एक वेगळाच भव्य दिव्य असा असतो. म्हणूनच अशा पायी दिंडी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी वारकऱ्यांनी, भाविकांनी मोठ्या संख्येने पायी दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे. असे आवाहनही प्रसिद्ध कीर्तनकार हभप संजयजी महाराज जगताप यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments