शिर्डी (प्रतिनिधी)
श्री त्र्यंबकेश्वर क्षेत्रातील पवित्र ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा हि भक्ती श्रद्धा आणि आनंदमय अध्यात्मिक अशी अनुभूती असल्याचे मत श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत व पंच दशनाम जुना आखाड्याचे संन्याशी स्वामी आत्माराम गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी आपल्या काही अनुयायी यांच्या समवेत नुकतीच या कार्तिक महिन्यात अत्यंत भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात ही त्रिंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर बोलताना त्यांनी सांगितले की,भगवान त्र्यंबकराज, गोदावरी माता, संत निवृत्तीनाथ महाराज, गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या पवित्र स्मरणाने आणि आशीर्वादाने भक्तमंडळींनी या ब्रह्मगिरी परिक्रमेचा मंगल संकल्प केला होता.व त्यानंतर
पहाटेच्या शांत, प्रसन्न आणि आध्यात्मिक अशा भक्तिमय वातावरणात या परिक्रमेची सुरुवात झाली. पर्वतराज ब्रह्मगिरीच्या पवित्र सान्निध्यात प्रत्येक पाऊल भगवंताच्या चरणी अर्पण करीत, नामस्मरण, भजन आणि जयघोषाच्या माध्यमातून भक्तांनी संपूर्ण मार्ग भक्तिरसाने भारावून टाकला.
या पवित्र परिक्रमेत स्वामी आत्माराम गिरी महाराज यांच्या समवेत सारथी अर्थात सुहास निर्मळ, सुनील पठारे, त्यांच्या सौभाग्यवती, राऊत ताई तसेच अन्य भक्तमंडळी मोठ्या श्रद्धेने, उत्साहाने आणि आनंदाने सहभागी झाली होती.
परिक्रमेच्या संपूर्ण मार्गावर भक्तांच्या मुखातून “ॐ नमः शिवाय!” “हर हर भोले, नमः शिवाय!” “नमः शिवाय, ॐ नमः शिवाय!” “ॐ नर्मदा माई रेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा!” असा मंत्र घोष सुरू होता.
या पवित्र जयघोषांनी ब्रह्मगिरी पर्वताचा परिसर शिवमय झाला. शरीराने पर्वताची परिक्रमा होत असताना मनाने भगवंताच्या चरणी समर्पण, श्रद्धा, भक्ती आणि आत्मशुद्धीचा अनुभव प्रत्येक भक्ताला लाभत होता. ही केवळ पर्वताची प्रदक्षिणा नव्हती, तर मनातील अहंकार, चिंता आणि सांसारिक बंधने दूर करून परमेश्वराशी नाते अधिक दृढ करण्याची एक आध्यात्मिक साधना होती. प्रदक्षिणा झाल्यानंतर कुशावर्त तीर्थ येथे पवित्र स्नान, पूजन आणि दर्शनाने या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेची मंगलमय सांगता झाली. गोदावरी मातेच्या पवित्र जलात स्नान करून भगवान त्र्यंबकराजांचे स्मरण, पूजन आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. परिक्रमेतील प्रत्येक क्षण हा भगवंताच्या कृपेचा प्रसाद असल्याची भावना सर्वांच्या मनात जागृत झाली.
भगवान त्र्यंबकराज, गोदावरी माता, संत निवृत्तीनाथ महाराज आणि गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संपूर्ण परिक्रमा निर्विघ्न, आनंददायी आणि मंगलमय रीतीने पूर्ण झाली.
या भक्तिमय यात्रेने भक्तांच्या मनात श्रद्धेचा दीप अधिक प्रज्वलित केला. परस्पर प्रेम, सहकार्य, सेवा, नामस्मरण आणि गुरुभक्ती यांचा सुंदर अनुभव सर्वांना प्राप्त झाला. परिक्रमा पूर्ण झाली; पण शिवनामाचा प्रवास अखंड सुरूच राहणार आहे. असे सांगत भगवान त्र्यंबकराज सर्व भक्तांवर कृपा करो, गोदावरी माता सर्वांचे जीवन पवित्र करो आणि सद्गुरूंचे आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनात भक्ती, शांती, आनंद व मंगलमयता प्रदान करो. असेही महंत संन्यासी आत्माराम गिरीजी महाराज यांनी शेवटी म्हटले.
0 Comments