राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरुषोत्तम पगारे यांना युरो एशियन युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट प्रदान!डॉ. सतीश खरडे यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान


 


शिर्डी (राजकुमार गडकरी)-
काही माणसांचे आयुष्य हे केवळ स्वतःच्या प्रगतीची कहाणी नसते, तर ते समाजाच्या परिवर्तनासाठी वाहिलेल्या एका निःस्वार्थ तपश्चर्येचे पर्व असते. शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून गेली पाच दशके ज्ञानदान, समाजसेवा आणि वंचितांच्या उन्नतीसाठी अविरत कार्य करणारे कोपरगाव येथे स्थायिक असणारे व सावळी विहीर बुद्रुक येथे अनेक वर्ष रयत शिक्षण संस्थेत सेवा देणारे आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरुषोत्तम पगारे सर यांच्या कार्यकर्तृत्वावर आता आंतरराष्ट्रीय सन्मानाची मोहोर उमटली आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि बहुआयामी योगदानाची दखल घेत युरो एशियन युनिव्हर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
दिल्ली येथे आयोजित पदवीदान समारंभास प्रकृती अस्वास्थ्यामुळे पगारे सर उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे युरो एशियन युनिव्हर्सिटीच्या सिलेक्शन कमिटीचे आंतरराष्ट्रीय सदस्य डॉ. सतीश खरडे यांच्या हस्ते पगारे सर यांच्या निवासस्थानी मानद डॉक्टरेटची पदवी, प्रमाणपत्र, मेडल आणि ट्रॉफी प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
पुरुषोत्तम पगारे सर म्हणजे शिक्षण आणि समाजसेवेचा ध्यास घेतलेले एक कृतीशील व्यक्तिमत्त्व. गेल्या पन्नास वर्षांपासून विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य अखंड सुरू ठेवले आहे. विशेष म्हणजे, शैक्षणिक प्रवाहापासून दूर राहिलेल्या वंचित घटकांसाठी गेली ३३ वर्षे विनाअनुदानित रात्रशाळा चालविण्याचे त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. ज्यांच्या आयुष्यात शिक्षणाची पहाट उगवली नव्हती, त्यांच्या जीवनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे.
परित्यक्ता महिलांचे प्रश्न सोडविणे, राष्ट्रभाषा हिंदीचा प्रचार व प्रसार, हिंदी शिक्षकांसाठी प्रबोधन शिबिरे, शिक्षकांचे संघटन, गुणवंत हिंदी शिक्षकांचा गौरव, राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची दखल घेणे, वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि वंचितांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणे, अशा अनेक क्षेत्रांत त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. शिक्षक म्हणून केवळ अभ्यासक्रम शिकविण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या या प्रदीर्घ आणि निःस्वार्थ शैक्षणिक सेवेला भारत सरकारनेही गौरविले असून, तत्कालीन राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानद डॉक्टरेटमुळे त्यांच्या कार्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना पगारे सर म्हणाले की, डॉ. सतीश खरडे साहेब यांच्या हस्ते हा सन्मान प्राप्त होणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. या सन्मानामागे माझ्यावर बालपणापासून संस्कार करणारे आई-वडील, परिवारातील सर्व सदस्य, स्व. गंगाधर गवारे मामा, स्व. ॲड. रावसाहेब शिंदे, स्व. डॉ. बापूसाहेब काळदाते, स्व. एस. एम. जोशी, स्व. भास्करराव बोरावके, स्व. किशोरभाई पवार तसेच समाजवादी परिवारातील असंख्य कार्यकर्त्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन आणि योगदान आहे.
खरे तर माणसाचे मोठेपण त्याने मिळविलेल्या पदव्यांमध्ये नसते, तर त्याच्या कार्यामुळे किती आयुष्यांना नवी दिशा मिळाली, किती अंधाऱ्या जीवनांत ज्ञानाचा प्रकाश पोहोचला आणि किती वंचितांना जगण्याचे बळ मिळाले, यामध्ये असते. पुरुषोत्तम पगारे सरांचे आयुष्य याच विचारांचे जिवंत उदाहरण आहे.
त्यांच्या या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल कोपरगावसह शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याचा हा गौरव म्हणजे एका व्यक्तीचा सन्मान नसून, शिक्षणसेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या मूल्यांचा गौरव आहे.
  हा मोठा सन्मान आदर्श शिक्षक पुरुषोत्तम पगारे सर यांना मिळाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे मोठे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments