राहुरी (प्रतिनिधी) : ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपयांचा दर मिळावा या साखर कारखाने सुरु झाल्यापासूनच्या मागणीवर अनेकदा आंदोलनने करुनही यश न मिळाल्याने अखेर बेमुदत आंदोलनाचा इशारा देत महामार्गावरच मंडप उभारून आज सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची तालुक्यातील शेतकरी नेते रवींद्र मोरे सह वंचित चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, नगरसेवक संतोष चोळके सह शेतकऱ्यांनी नगर-मनमाड महामार्ग जाम केला प्रसंगी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
ऊसाला ४ हजार भाव देण्याची मागणी करत आज राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर मनमाड रस्त्यावर शेतकरी संघटनेने चक्का जाम केल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून ती इतरत्र वळविण्यात आल्याने वाहनाच्या मोठ्या रांगा महामार्गावर लागल्या आहेत सकाळी साडे अकराच्या सुमारास सुरू झालेले आंदोलन अद्यापही सुरू असून या आंदोलनात विविध गटाचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले अद्यापि प्रशासनाकडून कुठलीही भूमिका स्पष्ट न झाल्याने हा चक्का जाम सुरूच राहणार असल्याचे शेतकरी नेते ॲड. अजित काळे यांनी सांगितले.आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांनी भाव जाहीर केला आहे मात्र अहिल्यानगरचे कारखानदार शेतकऱ्यांचा ऊस तोडून गळीत केले मात्र अद्याप भावाबाबत चुप्पी साधत शेतकऱ्यांना एकही रुपया दिवाळीत दिला नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्याचे पाप कारखानदारांनी केल्याचे शिंदे गटाचे शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी स्पष्ट केले.
कारखानदार गेंड्याचे कातड्याचे झाले असून मागणी करूनही यांनी अद्याप भाव जाहीर केला नसल्याने यांना वठणीवर आणण्यासाठी हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याने प्रकाश देठे यांनी यावेळी सांगितले विशेष म्हणजे शेतकरी आंदोलकांनी दुपारचे जेवण रस्त्यावर करून आंदोलन सुरू ठेवले आहे.
पोलिस प्रशासनाने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले मात्र तरीही त्यांना पर्यायी मार्ग काढून वाहतूक वळविण्यात आल्याचे दिसून आले. या आंदोलनात शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना (शिंदे गट) शेतकरी संघटना शरद जोशी विचार मंच, रयत क्रांती संघटना, प्रहार जनशक्ती संघटनेसह वंचित बहुजन आघाडी, मराठा एकीकरण समिती आदी उतरले आहेत त्यामुळे या आंदोलनाची धार वाढली असून या मधून शासनाला तत्काळ भाव जाहीर करून नरमाई ची भूमिका घ्यावी लागेल अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
चौकट..
सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या आंदोलनात नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीसह परिसर आंदोलकांनी फुलून गेला. नगर-मनमाड महामार्गावरील आंदोलकांनी टाकलेला मंडप, रस्त्यावरच जेवणावळीचे चित्र मुंबई, पुण्यावरुन येणारे गावाकडील चाकरमाने स्वागत करताना दिसले. तालुक्यातील एकूण शेतकरी, शेतमजूर आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले
0 Comments