दिलीप शिंदे
सोयगाव दि.०४--- सोयगाव आगाराची अमळनेर येथे मुक्कामी असलेली बस क्रमांक एम एच २० बीएल २६२१ ही दि.०४ बुधवारी सकाळी अमळनेर येथून सोयगाव कडे येण्यासाठी निघाली होती. पावणेदहा वाजेच्या सुमारास सदरील बस पाचोरा बस स्थानकावर आली. मात्र वाहकाकडे असलेले तिकीट मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाचोरा बस स्थानकावरून एकही प्रवासी न घेता बस सोयगाव कडे रिकामी निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे सोयगाव आगाराचा नियोजनाचा अभाव समोर आला आहे.
ऐन सणासुदीच्या वेळेस असा प्रकार घडल्याने प्रवाशांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे. या प्रकारामुळे प्रवाशांनी परिवहन महामंडळाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान गोंदेगाव येथील रहिवासी असलेले भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते समाधान सूर्यवंशी हे शासकीय कामांकरिता सोयगाव येण्यासाठी पाचोरा बस स्थानकावर थांबले होते. सोयगाव आगाराची अंमळनेर सोयगाव ही बस पाचोरा बस स्थानकावर आली. तिकीट मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मशीन मधून तिकीट निघत नव्हते त्यामुळे पाचोरा येथून सोयगाव येथे येणारे प्रवासी बसच्या वाहकाने पाचोरा बस स्थानक येथे सोडून दिले व बस प्रवासी न घेता रिकामी सोयगाव कडे रवाना झाली. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होऊन अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. उत्पन्नाविना डिझेल जाळीत आल्याने महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्हा नियंत्रक यांनी सोयगाव आगाराच्या मनमानी कारभाराकडे लक्ष देऊन प्रवाशांना लाल परी ची सेवा चांगली मिळावी यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. दरम्यान तिकीट मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास बस रिकामी ना आणता तिकीट देण्यासाठी बस मध्ये पर्यायी व्यवस्था असायला हवी अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. याप्रकरणी परिवहन महामंडळ काय निर्णय घेते हे मात्र निरत्तरीत आहे.
(सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे यांच्याकडून आलेली बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
0 Comments