शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत,दोन दिवसात घेतला सात जणांना चावा, वयोवृद्धाचा समावेश,न.प.चे दुर्लक्ष



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०३-- शहरात मोकाट कुत्र्यांनी दि. ०३ मंगळवारी चौघांना चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 


मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे शहरात नागरिक, वयोवृद्ध, महिला व चिमुकल्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नगरपंचायत कधी पावले उचलणार असा प्रश्न शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मध्ये शाकीरखा गनिखा वय ४८ रा. वेताळवाडी, ताजीम शेख वय २४ रा. शिवना ता. सिल्लोड, शिवाजी मोतीराम मालोदे वय ८५ रा. सोयगाव व नाथ इंगळे वय ३० वर्ष रा. सोयगाव असे असून चौघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान दि.०१ रविवारी मोकाट कुत्र्यांनी तिघांचे लचके तोडले होते यात गौरव ठाकरे वय १२ वर्ष रा. सोयगाव, रामेश्वर खिरडकर वय ४२ वर्ष रा. सोयगाव, चैतन्य दीपक थोटे वय ०४ वर्ष रा. सोयगाव असे जखमींची नावे आहेत. दोन दिवसात मोकाट कुत्र्यांनी सात जणांना जखमी केले आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच असल्याने ऐन सणासुदीला चिमुकल्यांच्या आनंदावर विरजण पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार याबाबत शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान या प्रकरणी नगरपंचायत चे प्रभारी मुख्याधिकारी संभाजीराव देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता बुधवार पासून मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी व लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असून बाहेरून कुत्रे शहरात आणून सोडणारांवर कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाशी पत्र व्यवहार केला जाईल असे प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

Post a Comment

0 Comments