शिर्डी( राजकुमार गडकरी)- संपूर्ण जगाला सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या व श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांवरील अढळ श्रद्धा आणि भक्तिभावातून देश-विदेशातील साईभक्त विविध मौल्यवान वस्तू व देणग्या श्री साईचरणी अर्पण करीत असतात. याच श्रद्धाभावातून मुबई येथील एका साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी अत्यंत आकर्षक व कलात्मक असे सुवर्ण-रजत घड्याळ अर्पण केले असून, या घड्याळाचे एकूण बिलमूल्य ९४ लाख ८६ हजार ७७० रुपये इतके असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडिलकर यांनी दिली.
या आकर्षक घड्याळाच्या निर्मितीसाठी १८ कॅरेट सोन्याचे ६६९.२२० ग्रॅम, ९२५ शुद्धतेच्या चांदीचे ३१९.७२० ग्रॅम तसेच ०.३०० कॅरेट रंगीत खड्यांचा वापर करण्यात आला आहे. हे घड्याळ मौल्यवान धातू आणि रंगीत खड्यांच्या सुरेख संयोजनातून साकारलेले असून ते कलात्मकतेमुळे विशेष आकर्षण ठरत आहे.
देणगीदार साईभक्ताच्या विनंतीवरून त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. दरम्यान साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी या देणगीदार साईभक्तावर साईबाबांची अशीच कृपा राहो, अशी यावेळी प्रार्थना केली. व त्यांनी या देणगीदार भक्ताचे आभार मानले आहेत.
0 Comments