दिलीप शिंदे
सोयगाव, दि.०३-- राष्ट्रसंत शिरोमणी श्री रुपलाल महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, तसेच बारी समाजाच्या प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय बारी समाज महासंघ आणि समस्त बारी समाजाच्या वतीने अंजनगाव सुर्जी येथे हजारोंच्या संख्येने विराट मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसील कार्यालयासमोर आत्मक्लेष ठिय्या आंदोलन व सामूहिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून आलेल्या हजारो समाजबांधवांनी या आंदोलनात सहभाग नोंदवत शासनाचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे, मुस्लिम बांधवांसह अन्य समाजघटकांनीही आंदोलनाला पाठिंबा दिल्याने सामाजिक एकोपा दिसून आला.
राष्ट्रसंत रुपलाल महाराज यांच्या विचारांचा आणि परंपरेचा जागर करत ‘दहा घरांत माधोगिरी मागून’ या उपक्रमाने आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल मंदिर येथून विराट मोर्चाला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी रुपलाल महाराजांच्या स्मारकासह समाजाच्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.गेल्या तीन वर्षांपासून स्मारकाच्या प्रश्नावर शासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. त्यामुळे यापुढे तोंडी आश्वासनांवर विश्वास ठेवणार नसून स्मारकासाठी निधी मंजूर झाल्याचा अधिकृत शासन निर्णय जीआर (GR) हातात मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका समाजबांधवांनी घेतली. आश्वासनांचे चॉकलेट नको, आता थेट शासन निर्णय द्या, असा स्पष्ट संदेश आंदोलकांनी शासनाला दिला. राष्ट्रसंत शिरोमणी श्री रुपलाल महाराज यांच्या स्मारक उभारणीसाठी तातडीने निधी मंजूर करून अधिकृत शासन निर्णय निर्गमित करावा, राष्ट्रसंत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ पूर्णपणे स्वतंत्र करून त्यासाठी आवश्यक निधीचे वाटप सुरू करावे, आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी बारी समाजातील प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात यावी अशा मागण्या आंदोलकांनी केले आहेत दरम्यान तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेत बच्चू कडू यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष घोलप यांच्याशी तसेच उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद घडवून आणल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.
दिवाळीनंतर बारी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आली. रुपलाल महाराजांचे स्मारक हा केवळ एका समाजाचा प्रश्न नसून राष्ट्रसंतांच्या विचारांचा, कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा सन्मान असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. शासनाने वेळकाढूपणा न करता स्मारकासाठी निधी मंजुरीचा शासन निर्णय तातडीने काढावा, अशी मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक व्यापक करून देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही अखिल भारतीय बारी समाज महासंघ आणि समस्त बारी समाजाच्या वतीने देण्यात आला. मात्र दिवाळीनंतर दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का आणि स्मारकाच्या निधी मंजुरीचा शासन निर्णय कधी निघतो, याकडे संपूर्ण बारी समाजाचे लक्ष लागले आहे.
0 Comments