जंगली कोटा जंगलातून सागवान लाकडांची तस्करी, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे वृक्षप्रेमी करणार तक्रार




दिलीप शिंदे 
सोयगाव, दि.२६-- वृक्ष संवर्धनासाठी सरकार लाखो रुपये खर्च करीत आहे. त्याच्या कित्येक पटीने वृक्षतोड सर्रास सुरू आहे. पावसाने मारलेली दडी, वाढते तापमान व दुष्काळाच्या झळा सध्या जनता सोसत असताना देखील वृक्षांवर अवैधरित्या कुऱ्हाडी चालवल्या जात असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होताना दिसत आहे. तर इकडे झाडांच्या तोड सुरू असताना ते रोखणे सरकारचे दायित्व असताना देखील राजकीय दृष्ट्या दुर्लक्ष केले जात आहे. 

वाढत्या महागाईत अधिकाऱ्यांची वाढलेली भूक यामुळे जंगल ओसाड पडण्याच्या मार्गावर आहे. पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी विविध सामाजिक संस्था, समाजसेवक, वृक्षप्रेमी ,राजकीय नेते ,वनविभाग, झाडे लावा झाडे जगवा यासाठी जनजागृती करीत आहे. एक पेड मा के नाम असे स्लोगन देत सर्वसामान्य जनतेला वृक्षारोपण करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.जंगलाला प्रथम दर्जा देणारे सोयगाव वनविभाग वन परिमंडळ बनोटी येथील प्रभारी वनरक्षक मनगटे यांच्याच कार्यक्षेत्रात जंगलातील सागवान लाकड तोडून मोठ्या प्रमाणात लाकडांची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार दि.२५ रविवारी उघडकीस आला आहे. जंगलात ठिकठिकाणी कुऱ्हाडीने तोडलेले सागवान झाडांची खोडं स्पष्ट दिसत आहे. यामुळे जंगलाला प्राधान्य देणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातच तस्करीच्या घटना घडत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या घटनांमुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावर प्रश्न निर्माण झाले आहे. वनविभागाचे वनरक्षक वनपाल हे कर्तव्य ठिकाणी रहात नसल्याने अवैधरित्या वृक्षांची केली जाणारी तोड रोखण्यात सोयगाव वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. लाकूड तस्करांनी वनविभागाच्या जंगलाकडे मोर्चा वळविल्याने जंगलातील सागवान लाकडांची अस्तित्व धोक्यात आले आहे. यामुळे जंगलातील पशुपक्षी यांच्या आदिवासावर एक प्रकारे घाला घातला जात आहे. अन्नाच्या शोधात गेलेले पशु पक्षी पुन्हा आपल्या घरट्याकडे परततात तेव्हा त्यांना आपली घरटे दिसत नसल्याने जंगलात त्यांची होणारी चिव चिव व घरटे शोधण्यासाठी होणारी धडपड ही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कशी कळणार अशी चर्चा बनोटी परिसरात रंगली आहे. जंगलाची देखभाल करणारे रक्षक असलेले वनविभागच सोयगाव तालुक्यात भक्षक असल्याची भावना वृक्षप्रेमी मधून बोलली जात आहे. दि.२३ शुक्रवारी तालुक्यातील जंगली कोटा शिवारात गेल्या तीन-चार दिवसापासून लाकूड तस्करांकडून दुष्काळ परिस्थितीचा फायदा घेत शेतकऱ्यांना आमिष दाखवून डेरेदार वृक्षांची कत्तल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. वनरक्षक, वनपाल व वनपरिक्षेत्राधिकारी सोयगाव यांना वृक्षप्रेमींकडून वेळोवेळी माहिती देऊन देखील वनविभागाकडून कारवाई होत नाही. गोपनीय माहिती देणाऱ्यांची नावे ही लाकूड तस्करांना वनविभागाकडून सांगितली जाते त्यामुळे गोपनीय माहिती देणाऱ्या वृक्षप्रेमींच्या जीविताला वनविभाग धोका निर्माण करीत आहे. सोयगाव वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना माहिती देऊन देखील कारवाई केली जात नाही. सोयगाव तालुक्यात होत असलेल्या वृक्षांच्या अवैद्यरीत्या थोडी विरोधात व सोयगाव वन विभागाच्या वनपरिक्षेत्राधिकारी वन परिमंडळाचे वनपाल गणेश सपकाळ, व वनरक्षक यांच्याविरुद्ध प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास राव यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे वृक्षप्रेमींनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments