दिलीप शिंदे
सोयगाव, दि.२३-- सोयगाव तालुक्यात वृक्ष संवर्धनासाठी सरकार लाखो रुपये खर्च करीत आहे. विविध सामाजिक संस्था, समाजसेवक, वृक्षप्रेमी ,राजकीय नेते ,वनविभाग झाडे लावा झाडे जगवा यासाठी जनजागृती करीत आहे. एक पेड मा के नाम असे स्लोगन देत सर्वसामान्य जनतेला वृक्षारोपण करण्यासाठी प्रारुप्त केले जात आहे मात्र वृक्षांची देखभाल करणारे रक्षक असलेले वनविभागच सोयगाव तालुक्यात भक्षक झाल्याचा प्रत्यय दि.२३ शुक्रवारी उघडकीस आला आहे. तालुक्यातील जंगली कोटा शिवारात गेल्या तीन-चार दिवसापासून लाकूड तस्करांकडून दुष्काळ परिस्थितीचा फायदा घेत शेतकऱ्यांना आमिष दाखवून डेरेदार वृक्षांची कत्तल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
वनरक्षक, वनपाल व वनपरिक्षेत्राधिकारी सोयगाव यांना वृक्षप्रेमींकडून वेळोवेळी माहिती देऊन देखील वनविभागाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. कर्तव्यावर असलेले वनविभागाचे वनरक्षक व वनपाल हे मुख्यालय राहत नसून ये -जा करीत असल्याने लाकूड तस्करीचे प्रमाण वाढले आहे. वृक्षप्रेमींनी माहिती देऊन देखील रक्षक असलेला वनविभाग भक्षकाची भूमिका निभावत असल्याची चर्चा बनोटी परिसरात सुरू आहे.दरम्यान बनोटी वनपरिमंडळ वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. सदर वृक्षतोडीमध्ये सागवान, खैर व इतर वनवृक्षाची तोड होत असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाबाबत जीवधारा फाउंडेशनच्या वतीने संबंधित वनपाल व वनरक्षक यांना यापूर्वी तोंडी तसेच दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली आहे. तथापि, आमच्या निदर्शनास आलेल्या परिस्थितीनुसार या प्रकरणात ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. सदर प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर दखल घेऊन सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. वनक्षेत्रातील अनधिकृत वृक्षतोडी मुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची तसेच वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. वन्यजीवांचे संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण या उद्देशाने कार्यरत असलेल्या जीवधारा फाउंडेशनच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी सोयगाव यांना दि.२३ शुक्रवारी दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई केली जाते याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. ( दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
0 Comments