राजुरी ( वार्ताहर ) राहाता तालुक्यातील
राजुरी येथे घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत बचत गटांना मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.
राहाता तालुक्यातील राजुरी ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत ग्रामपंचायत राजुरी बचत गटातील सी आर पी व ग्रामसंघ पदाधिकाऱ्यांसाठी घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत विशेष मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.केंद्र सरकारने नव्याने लागू केलेले सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रुल्स 2026 हे १ एप्रिल २०२६ पासून देशभरात लागू झाले आहेत. या नवीन नियमात घनकचऱ्याचे उगमस्थळीच चार प्रकारात ओला कचरा, सुका कचरा,घातक कचरा व सॅनिटरी कचरा अशा प्रकारे वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.या वेळी उपस्थितांना कचऱ्याचे उगमस्थळी वर्गीकरणाचे महत्त्व,ओला कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती, सुका कचऱ्याचे संकलन व पुनर्चक्रण, तसेच गावात स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग कसा वाढवावा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
ग्रामपंचायत स्तरावर घरोघरी जाऊन जनजागृती करण्याची जबाबदारी बचत गटाच्या माध्यमातून प्रभावीपणे पार पाडली जाऊ शकते. प्रत्येक सी आर पी व ग्रामसंघ पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कचरा वर्गीकरण व व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून राजुरीला कचरामुक्त व आदर्श ग्रामपंचायत बनवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.या कार्यशाळेला सागर आहेर गट समन्वयक पंचायत समिती राहाता, रवींद्र खलाटे पंचायत समिती राहाता,पवन पटारे पं स राहाता ग्रामपंचायत अधिकारी वैशाली तोडमल स्वच्छताग्रही,ग्रामसंघाचे पदाधिकारी, बचत गटाच्या सी आर पी व महिला मोठ्या संख्येने या कार्यशाळेत उपस्थित होते.
0 Comments