दिलीप शिंदे
सोयगाव, दि. २१ --- सोयगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी शासकीय आरोग्य सेवा हा मोठा आधार आहे. मात्र, तालुका आरोग्य विभागातील मंजूर ८२ पदांपैकी तब्बल ३३ पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था ढासळली आहे.
तालुक्यातील ८२ गावांमधील आरोग्यसेवेचा मोठा भार अवघ्या १२ महिला आरोग्य सेविकांवर (एएनएम) पडत असून, अतिरिक्त पदभारामुळे आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या २३ उपकेंद्रांच्या इमारती असूनही पुरेसे मनुष्यबळ नसल्याने आरोग्य उपकेंद्रे बंद असून सुरु न होताच उपकेंद्रांच्या इमारतींची दुरावस्था झाली आहे.सोयगाव तालुक्यात जरंडी, बनोटी आणि सावळदबारा अशी तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या केंद्रांच्या अंतर्गत २३ आरोग्य उपकेंद्रांमार्फत ८२ गावांना आरोग्य सेवा पुरविली जाते. तालुका आरोग्य कार्यालयांतर्गत एकूण ८२ पदे मंजूर असून, त्यापैकी ४९ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित ३३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असून, दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील २३ उपकेंद्रांसाठी आवश्यक असलेल्या महिला आरोग्य सेविकांची संख्या अपुरी आहे. सद्यस्थितीत अवघ्या १२ महिला आरोग्य सेविकांमार्फत ८२ गावांतील आरोग्यसेवेची जबाबदारी सांभाळली जात आहे. अनेक सेविकांकडे तीन ते चार उपकेंद्रांचा अतिरिक्त पदभार असल्याने गावोगावी भेटी देणे, माता-बाल आरोग्य सेवा, लसीकरण, गर्भवतींची तपासणी, आरोग्यविषयक जनजागृती आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
एका सेविकेकडे अनेक गावांची जबाबदारी असल्याने प्रत्येक गावाला पुरेसा वेळ देणे कितपत शक्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुर्गम व डोंगराळ भागातील गावांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविताना कर्मचाऱ्यांना प्रवास आणि वेळेच्या मर्यादांचाही सामना करावा लागतो. परिणामी, आरोग्य सेविकांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यासाठी तातडीने रिक्त पदे भरण्याची गरज निर्माण झाली आहे.
जरंडी केंद्रांतर्गत ३१ गावांचा भार
जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १० उपकेंद्रे असून, त्यामध्ये ३१ गावांचा समावेश आहे. या क्षेत्रासाठी पाच महिला आरोग्य सेविका कार्यरत आहेत. त्यापैकी दीपाली सोळुखे यांच्याकडे वरखेडी बु., पळसखेडा आणि सोयगाव या तीन उपकेंद्रांतील सात गावांची जबाबदारी आहे. अश्विनी हिवराळे यांच्याकडे आमखेडा, निंबायती आणि घोसला या तीन उपकेंद्रांतील १४ गावांचा भार आहे. दुर्गा आरते यांच्याकडे कंक्राळा, सावरखेडा आणि फर्दापूर परिसरातील गावांची जबाबदारी आहे. संगीता वानखेडे यांच्याकडे जरंडी उपकेंद्राची जबाबदारी असून, अनिता राठोड यांच्याकडे आरोग्य केंद्रातील पर्यवेक्षकीय जबाबदारी आहे.
बनोटी केंद्रांतर्गत ३३ गावांचा समावेश
बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नऊ उपकेंद्रांमध्ये ३३ गावांचा समावेश आहे. काजल वाघ यांच्याकडे गोंदेगाव, पळाशी आणि किन्ही या तीन उपकेंद्रांतील नऊ गावांची जबाबदारी आहे. शिल्पा परदेशी यांच्याकडे पहुरी बु., निंभोरा आणि नांदगाव या उपकेंद्रांतील ११ गावांचा भार आहे. हर्षाली भगत यांच्याकडे वडगाव तिग्जी उपकेंद्रांतर्गत चार गावांची, तर सुनीता राठोड यांच्याकडे हनुमंतखेडा आणि बनोटी या दोन उपकेंद्रांतील नऊ गावांची जबाबदारी आहे.
सावळदबारा केंद्रालाही मनुष्यबळाची गरज
सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चार उपकेंद्रांमध्ये १८ गावांचा समावेश आहे. प्रियंका सुरडकर यांच्याकडे पिंपळा उपकेंद्रांतर्गत चार गावांची जबाबदारी आहे. सपना सोनवणे यांच्याकडे मोलखेडा आणि ढाबा या दोन उपकेंद्रांतील आठ गावांचा भार आहे. अर्चना चव्हाण यांच्याकडे सावळदबारा उपकेंद्रांतर्गत सहा गावांची जबाबदारी आहे.
परिचरांची १४ पैकी ११ पदे रिक्त
तालुका आरोग्य कार्यालयातील पदनिहाय आकडेवारीनुसार, परिचरांची १४ पदे मंजूर असताना केवळ तीन कर्मचारी कार्यरत असून, ११ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नऊ मंजूर पदांपैकी सात पदे भरलेली असून, दोन रिक्त आहेत. आरोग्य सेवक पुरुषांच्या १७ पदांपैकी १४ पदे भरलेली असून, तीन रिक्त आहेत. आरोग्य सेवक महिलांच्या २५ मंजूर पदांपैकी केवळ १२ पदांवर कर्मचारी कार्यरत असून, तब्बल १३ पदे रिक्त आहेत. औषधनिर्माण अधिकाऱ्यांच्या पाच पदांपैकी दोन, तर कनिष्ठ सहाय्यकांच्या चार पदांपैकी एक पद रिक्त आहे. आरोग्य सहाय्यक पुरुषांच्या एका संवर्गातील चार पदे पूर्ण भरलेली आहेत, तर दुसऱ्या संवर्गातील तीन पदांपैकी दोन पदांवर कर्मचारी कार्यरत असून, एक पद रिक्त आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे एक पद मंजूर असून, त्यावर अधिकारी कार्यरत आहेत.
आरोग्य सुविधांसाठी शासनाकडून पायाभूत सुविधा उभारल्या जात असताना त्या प्रभावीपणे चालविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. सोयगाव तालुक्यातील २३ उपकेंद्रांच्या इमारती उभ्या असल्या, तरी रिक्त पदांमुळे उपलब्ध सुविधांचा नागरिकांना अपेक्षित लाभ मिळतो का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि गरीब कुटुंबांना खासगी आरोग्यसेवेचा खर्च परवडणे कठीण ठरू शकते. अशा वेळी ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य व्यवस्था सक्षम करणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी ठरते.
जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत जिल्ह्यात आरोग्य सेविकांची सुमारे ५० टक्के, तर वर्ग चारची सुमारे ७५ टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्यमंत्र्यांसह ग्रामविकास विभागाच्या सचिवांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आहे. राज्यस्तरावरून पदभरतीसाठी प्रयत्न सुरू असून, मंजुरी मिळताच पदे भरण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, राज्यस्तरावरील मंजुरी आणि प्रत्यक्ष नियुक्त्या होईपर्यंत दुर्गम गावांतील नागरिकांना पुरेशी आरोग्य सेवा मिळण्याचे आव्हान कायम राहणार आहे. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील रिक्त पदे तातडीने भरणे, उपकेंद्रनिहाय मनुष्यबळाचे नियोजन करणे आणि उपलब्ध आरोग्य सुविधांचा प्रभावी वापर सुनिश्चित करणे आवश्यक आहे. अन्यथा, इमारती आणि सुविधा असूनही मनुष्यबळाअभावी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची अडचण कायम राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
--------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया:-सोयगाव तालुक्यातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आम्ही वेळोवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करीत आहोत जोपर्यंत तालुक्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी संघर्ष करीत राहील.
श्रीमती सविता ताई गव्हांडे, पंचायत समिती सदस्या सोयगाव
0 Comments