लोहगाव (वार्ताहर): जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अहिल्यानगर आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग, अहिल्यानगर यांच्या वतीने कोकमठाण येथे वरिष्ठ व निवड श्रेणीचे जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आज प्राचार्य डॉ. राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशिक्षण जिल्हा समन्वयक अरुण भांगरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले.
नगर जिल्ह्यातील प्राथमिक ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत सेवेची १२ व २४ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेपासून वेतन वाढीपर्यंत विविध लाभांशी संबंधित प्रशिक्षण असल्याने शिक्षकांसाठी महत्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील २८६९ नोंदणी केलेल्या पात्र शिक्षकांना दि. १३ ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तालुकानिहाय प्रशिक्षण देण्यासाठी कोकमठाण येथे सुलभकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात परिपाठाने झाली. या प्रशिक्षण उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता व जिल्हा समन्वयक अरुण भांगरे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अनमोल होन यांनी केले. यावेळी चंद्रशेखर हासे व डॉ. अरविंद सगभोर यांनी सुलभकांचा परिचय करून दिला. अध्यक्षीय भाषणातून वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे यांनी प्रशिक्षणाचे महत्व विशद केले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांचे सक्षमीकरण व त्यातून विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साध्य होणार असल्याचे मत त्यांनी मांडले.या जिल्हास्तर प्रशिक्षणासाठी आत्मा मालिक संकुलामार्फत उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यात एकाचवेळी पात्र शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार असून अहिल्यानगर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात हे प्रशिक्षण १४ तालुक्यात एकाच वेळी होणार आहे. याप्रसंगी व्यासपीठावर प्रकाश पारखे, जोत्स्ना खोजे, विजय देशमुख, अशोक गायकवाड, जालिंदर गागरे, सुभाष जाधव, अविनाश निकाळजे, उज्वला वासाळ यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट यांनी केले तर डॉ. अरविंद सगभोर यांनी आभार मानले.
0 Comments