शिर्डी येथीलश्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या १०८ व्या श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवास आज सोमवारी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली. आरतीनंतर पहाटे ०५.४५ वाजता श्री साईबाबांच्या प्रतीमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी पोथी घेऊन तर प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले व मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला.
मिरवणूक व्दारकामाईत आल्यानंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणास प्रारंभ झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रथम, प्रशासकिय अधिकारी अविनाश कुलकर्णी यांनी व्दितीय, प्रशासकिय अधिकारी अतुल वाघ यांनी तृतीय, वैद्यकिय संचालक,
श्री साईनाथ रुग्णालय डॉ. मैथिली पितांबरे यांनी चौथ्या व प्र. अधिक्षक, प्रकाशने विभाग श्रीमती सुनिता शिंदे यांनी पाचव्या अध्यायाचे वाचन केले.
सकाळी ०७.०० वाजता समाधी मंदिरात श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक श्रींची पाद्यपुजा केली. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती, दुपारी ०१.०० ते ०३.०० यावेळेत सौ. अश्विनी सरदेशमुख यांचा ‘स्वरांजली संगीत सेवा’ कार्यक्रम, दुपारी ०४.०० वाजता ह.भ.प. सौ. राधिका गोपालकृष्ण कालेकर, कोल्हापुर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. तर सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती व रात्रौ ०७.०० ते ०९.३० यावेळेत श्री. मधुसुदन भुवड, बोरिवली यांचा ‘साईराम संगीत संध्या’ श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न होणार असुन, रात्रौ ०९.१५ वाजता गावातून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूकीनंतर श्रींची शेजारती होईल. तर अखंड पारायणासाठी श्री व्दारकामाई मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात येणार आहे.
श्री पुण्यतिथी उत्सवा निमित्त मुंबई - शिर्डी येथील साई व्दारकामाई मंडळाच्या वतीने करणेत आलेली आकर्षक विद्युत रोषणाई, उभारणेत आलेला भव्य व आकर्षक ‘श्री साईद्वारकाधिश’ देखावा तसेच गुजरात येथील दानशुर साईभक्त श्रीमती ममता सतिष कपिलेश्वरकर यांच्या देणगीतून मंदिर व मंदिर परीसरात करण्यात आलेल्या आकर्षक फुलांच्या सजावटीने साईभक्तांचे लक्ष वेधून घेतले.
उद्या मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर हा श्रींचे पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०७.१५ वाजता ध्वजपुजन तर, सकाळी ०७.३० वाजता श्रींचे समाधी मंदिरावरील सुवर्ण कळसाला यावर्षी ७४ वर्ष पूर्ण होऊन ७५ अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत असल्याने श्रींचे समाधी मंदिर सुवर्ण कलशारोहण कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर सकाळी ०९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता ह.भ.प. सौ. राधिका गोपालकृष्ण कालेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींचे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती तर दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत श्री गौतम अरोरा, दिल्ली यांचा ‘साईभजन’, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. श्री रोहित दुग्गल, श्रीरामपुर यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम, सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती होईल. सायं.०७.३० ते १०.०० वा. संगीत दिग्दर्शक व गायक श्री राम शंकर, मुंबई यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून श्रींच्या रथाची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.३० यावेळेत श्रींच्या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. तर उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्यामुळे दिनांक २० ऑक्टोबर रोजी रात्रौ १०.०० वाजता होणारी शेजारती व दिनांक २१ ऑक्टोबर रोजी पहाटेची ०५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार नाही. असे साई संस्थांनने म्हटले आहे.
0 Comments