लोहगाव (वार्ताहर):
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी संकुल, प्रवरानगर येथे विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहात आणि जयघोषात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर अण्णांच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक देखावा, कलशधारी विद्यार्थ्यांनी, लेझीम, झांज आणि टिपऱ्यांच्या तालावर ठेका धरत परिसर दणाणून सोडला. कर्मवीर अण्णांचा विजय असो आणि स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद अशा दणदणीत घोषणा देत विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच जोश आणि उत्साह पाहायला मिळाला.
मिरवणुकीच्या सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी संकुलाचे प्राचार्य दिलीप डहाळे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपप्राचार्य संजय डुबे, पर्यवेक्षिका संगिता सांगळे, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख डॉ. शरद दुधाट आणि बाबासाहेब अंत्रे यांच्यासह संकुलातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्याने विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे आणि अण्णांच्या विचारांच्या जयघोषाने संपूर्ण प्रवरानगर परिसर कर्मवीरमय होऊन गेला. तांबेनगर येथील ग्रामस्थांनी कर्मवीर प्रतिमेचे औक्षण केले.
0 Comments