दिलीप शिंदे
सोयगाव दि. २३ --- अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर सोयगाव तालुक्यात ७५ गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.
विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक मार्गात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बंदोबस्तासाठी २ पोलिस अधिकारी, २८ पोलिस अंमलदार आणि २८ होमगार्ड असा ५८ जणांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे.
सोयगाव शहर व आमखेडा येथील श्री गणेशमूर्तींचे सोयगाव-जरंडी रस्त्यावरील गवळणीचा नाला याठिकाणी असलेल्या पाझर तलाव येथे विसर्जनाची सुविधा करण्यात आली आहे. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. दरम्यान पोलिस प्रशासनाने गणेश मंडळांना मिरवणुकीसंदर्भात विविध निर्देश दिले आहेत. मिरवणुकीत डीजे, डॉल्बी किंवा अत्याधुनिक ध्वनी निर्माण करणाऱ्या साउंड सिस्टिमचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश तसेच प्रचलित कायदे व नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना गणेशोत्सव मंडळांना देण्यात आल्या आहेत.
मिरवणुकीतील वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आवश्यक तपासणी करून वैध प्रमाणपत्र व परवानगीपत्र सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनांच्या मूळ रचनेत अनधिकृत फेरबदल करू नये, तसेच लेझर लाईट, शार्पिंग किंवा नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या साधनांचा वापर करू नये, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता बाधित होणार नाही, याची जबाबदारी संबंधित गणेश मंडळावर राहणार आहे. ध्वनी मर्यादे संदर्भात सपोनी दिनकर गोरे, पोलिस कर्मचारी गजानन दांडगे, अजय कोळी, सादिक तडवी यांनी डेसिबल मीटरच्या योग्य वापराची माहिती देऊन नियमानुसार दिवसा ५५ डेसिबल तर रात्रीच्या १०:०० नंतर ४५ डेसिबल पाळण्याचे मंडळाना सूचित केले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास मिरवणुकीतील प्रवेश नाकारण्यासह फौजदारी व इतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर गोरे यांनी दिला आहे. गणेश विसर्जन शांततेत, डीजेमुक्त आणि सामाजिक सलोखा राखून साजरे करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे सपोनी दिनकर गोरे यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
0 Comments