दिलीप शिंदे
सोयगाव दि. ०३ -- २५ ऑगस्ट ते ०८ सप्टेंबर या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेत्रदानाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दिनाजी खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित पाटील व नेत्रचिकित्सा अधिकारी सुहासिनी जावळे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी नागरिक व रुग्णांना नेत्रदानाचे महत्त्व, नेत्रविषयक आजार, अंधत्वाची प्रमुख कारणे, प्रतिबंधात्मक उपाय तसेच नेत्रदानासंदर्भातील विविध समज-गैरसमज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील गरजू व्यक्तींना दृष्टी मिळवून देण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन डॉ.अजित पाटील यांनी उपस्थितांना केले.दरम्यान, नेत्रचिकित्सा अधिकारी सुहासिनी जावळे यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. यावेळी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांची निवड करण्यात आली. तसेच विविध दृष्टीदोषांबाबत मार्गदर्शन करून आवश्यक उपचार व उपाययोजनांची माहिती देण्यात आली.नेत्रदान पंधरवड्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये नेत्रदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून अंधत्व निवारणासाठी नेत्रदानसंमतीपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.चव्हाण, सुनिल वानखेडे, कारके , परिचारिका श्रीमती ज्योती आचरे सिस्टर, पंकज मंडवे, औषध निर्माता भुषण चव्हाण ,श्रीमती रोकडे,गणेश बोटकर , सपकाळे ,श्रीमती ज्योती भवर व रुग्णांलयातील इतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments