लोणी, दि. ९ : प्रतिनिधी ( रूपाली भालेराव )
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील व कृषी संचालक प्रा. उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा कृषी शास्त्र संस्था, लोणी, पायरेन्स संचालित कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या प्रक्षेत्रावर शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव शिरसाट, पालक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिवार फेरीत सरस्वती महिला शेतकरी गट, पिंपरी निर्मळ यांच्या महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध आधुनिक शेती तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण पिके आणि शेतीतील प्रयोगांची माहितीपूर्वक पाहणी व अभ्यास केला.
सरस्वती महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा मीनाताई निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली सुरेखा निर्मळ, वनिता निर्मळ, कावेरी निर्मळ, मोहिनी निर्मळ, माया निर्मळ, सुवर्णा निर्मळ, सविता निर्मळ, कविता निर्मळ आणि स्वाती निर्मळ यांनी शिवार फेरीत सहभाग घेतला.
यावेळी महिलांनी सौ. शालिनीताई विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. शेतीतील नवीन प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञान, महिला शेतकऱ्यांसाठी उपलब्ध संधी आणि शेतीतून अधिक उत्पन्न मिळविण्याच्या विविध उपाययोजनांबाबत महिलांनी माहिती जाणून घेतली.
शिवार फेरीदरम्यान भाजीपाला, फळबाग, ऊस तसेच सफरचंद, ॲपल बेर, खजूर यांसारख्या विविध नाविन्यपूर्ण पिकांच्या प्रात्यक्षिकांची पाहणी करण्यात आली. कमी पाणी, कमी खर्च आणि उपलब्ध साधनांचा कार्यक्षम वापर करून अधिक उत्पादन घेण्याच्या तंत्रज्ञानाचा महिलांनी बारकाईने अभ्यास केला.
सरस्वती महिला शेतकरी गटाच्या महिलांचा हा अभ्यासपूर्ण सहभाग महिला शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे टाकलेले प्रेरणादायी पाऊल ठरले असून, या शिवार फेरीतून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या शेतीत करून उत्पादन व उत्पन्न वाढविण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला.
सत्तेचा महासंग्राम-
सहसंपादक - साबळे ज्ञानेश्वर
0 Comments