प्रवरा क्रीडा महोत्सव २०२६ पारितोषिक वितरण
लोणी दि.२४ प्रतिनिधी
मैदानी खेळामुळे आरोग्य उत्तम राहण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या कौशल्याला नवी दिशा मिळते. शिक्षकांनी मैदानात उतरून खेळले, तर विद्यार्थीही निश्चितपणे मैदानाकडे वळतील. खेळातून आरोग्य जपा, संघभावनेतून प्रवरेला पुढे न्या
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि सेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून, या क्रीडा संस्कृतीतून प्रवरेचे खेळाडू भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचतील, असा विश्वास जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित प्रवरा क्रीडा महोत्सव २०२६च्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संरक्षण क्षेत्रातील उद्योजक गणेश निबे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सौ. मंदाताई निबे, सौ. मंजुश्री निबे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम, यांच्यासह संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, “भारत आज संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. या क्षेत्रात प्रवरेचे भूमिपुत्र गणेश निबे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. प्रवरेचा विद्यार्थी आज संरक्षण क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे, ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे.”
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबरच सेवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचे कौतुक करताना ते म्हणाले की, शिक्षणासोबतच संघभावना, शिस्त आणि संघटितपणे काम करण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणासोबत विविध उपक्रमांच्या माध्यमातून ही मूल्ये रुजविण्याचे काम सुरू आहे. रोजगारनिर्मितीच्या क्षेत्रातही प्रवरा आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले.
“खेळाच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहते. शिक्षकांना मैदानी खेळांची आवड निर्माण झाली, तर विद्यार्थीही मैदानावर येतील. यातून प्रवरेचे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचतील. असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
यावेळी उद्योजक गणेश निबे यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “प्रवरेच्या भूमीने ज्ञान दिले, सन्मान दिला आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातत्याने केलेल्या सहकार्यामुळे प्रवरेचा विद्यार्थी आज जागतिक पातळीवर पोहोचला आहे.”
संरक्षण क्षेत्रात काम करत असताना प्रवरेचा अभिमान कायम बाळगणार असल्याचे सांगत, परिसरातील विद्यार्थ्यांना आणि नवउद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी घेतलेला संकल्प पुढे नेण्याची ग्वाही निबे यांनी दिली. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना निबे उद्योग समूहाच्या माध्यमातून सातत्याने सहकार्य करण्याची भूमिका राहील, असे त्यांनी सांगितले. प्रवरा शैक्षणिक संकुल जागतिक स्तरावर वाटचाल करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
क्रीडा महोत्सवांतर्गत व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, क्रिकेट यांसह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या महाविद्यालयीन तसेच सेवकांच्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.
या स्पर्धांचे नियोजन संस्थेच्या क्रीडा विभागाचे शिक्षण संचालक डॉ. उत्तमराव अनाप, डॉ. रमेश दळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच क्रीडा शिक्षकांच्या संपूर्ण पथकाने केले.
0 Comments