या संसार रुपी सागरात तरुन जाण्यासाठी फक्त नामस्मरणांचीच नौका तारू शकते, या मानवी जीवनात आल्यानंतर तुम्ही कितीही कमावले तरी जाताना काही बरोबर येत नाही. बरोबर येते ते फक्त राम नाम, त्यासाठी या आयुष्यात राम नावाचं नामस्मरण करा .असं ह भ प ऋषिकेश महाराज चव्हाण (ठाणगावकर) यांनी सांगितलं.
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे २३वे श्री साई सच्चरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताहा मध्ये किर्तन मालिकेचे चौथे पुष्प गुफतांना त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चार चरणाच्या घेतलेल्या अभंगाचे निरूपण, चिंतन करताना अगदी सुस्पष्ट व सर्वांना समजेल असे अनेक दृष्टांत देत पुढे म्हटले की, संसार हा सागर आहे, सागरात जसे अनेक मासे असतात, माशांना सागर व सागराला मासे प्रिय असतात. मात्र जाळ्यामध्ये मासा सापडला तर पाणी मात्र जाळ्यातून निघून जाते फक्त मासाच जाळ्यात अडकतो. असा हा संसार रुपी सागर असून आपण सगळे त्यामध्ये जणू मासे आहोत. आपणाला संसार व संसाराला आपण प्रिय आहोत. मात्र मोह,माया आदींचे जाळे आपणाला आपल्या जाळ्यात ओढते, आपण त्यात सापडतो. त्यावेळी कोणी बरोबर येत नाही. देह सुद्धा बरोबर येत नाही. बरोबर येते ते फक्त नामस्मरण, म्हणून राम नावच तुम्हाला तारून नेऊ शकते. राम नामाची ताकद मोठी आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात कितीही धावपळ केली, कितीही कमाई केली, तरी जाताना काही बरोबर येत नाही, येते ती राम नामाची प्रॉपर्टी, म्हणून ती आपल्या जीवनात कमवा आपल्या नावावर असू द्या. आपण आपल्या पूर्वजांना विसरतो, सहाव्या पिढीचे सुद्धा नाव आठवू शकत नाही. त्यांची प्रॉपर्टी आपण खातो. मात्र त्यांचे नाव विसरतो. त्यांचे नावही इतिहास जमा होते .तेव्हा भविष्यात आपल्या पिढीकडूनही आपले नाव इतिहास जमा होईल. त्यामुळे आपण आवश्यकतेपेक्षा अधिक पळापळ, धडपड करण्यापेक्षा नामस्मरण करा, अखंड हरिनाम सप्ताह, राम नाम यांची संगत करा. सत्संग करा, राम नाम कंठी असू द्या, हेच आयुष्यात कामी येईल. बाकी सगळं व्यर्थ आहे. कारण या जीवनामध्ये प्रपंच करताना जसे महिलांना माहेर ,सासर आहे, माहेरामध्ये प्रत्येक माया भगिनींना आनंद सुख वाटते. तसाच माहेरचा सुख आनंद घ्यायचा असेल तर हा राम नाम, हरिनाम, अध्यात्मिक सोहळा आहे. तेच खरे या संसारात सर्वांचे सुख देणारे माहेर आहे . म्हणूनच माझे माहेर पंढरी म्हटले आहे. संसाररूपी सासर हे नाशिवंत आहे. मात्र तेथे आपण नांदत आहोत. नुसते पैशासाठी, बाह्य सुखासाठी धावत आहोत. येथे कोणत्याही प्रकारे भौतिक सुख मिळावे यासाठी धडपड सुरू असते .पण असे पैशाचे बंडल कमावणारेही बंडलच असतात. असे विनोदात सांगत खरा आनंद रामनामात आहे. हरिनाम सप्ताहात आहे. त्यामुळे इकडे अधिक वेळ द्या. परमेश्वराने प्रत्येकाला या जीवनात आयुष्य म्हणजे वेळ दिला आहे. ज्या वेळेचा सदुपयोग करा. अन्यथा कितीही वेळ दिला तरी या जीवनात मेळ बसत नाही.व त्यामुळे खेळ झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी
राम नामाचे फळ आपल्याकडे असू द्या. असे सांगत या राम नामाची महती मोठी आहे.या रामनामाचे अर्थ अनेक होतात. असा हा बहुमोलाचा राम नाम शब्द आहे. त्याचे अनेक अर्थ आहेत पण हे अर्थ गुगल वर सुद्धा येणार नाहीत. असा हा रामनाम शब्द आहे. एखाद्याला लाज वाटली तर तो, हाय राम! म्हणतो, तर एखाद्याचे काही वाईट झाले तर तो, हे राम! म्हणतो जर कोणी ओळखीचं भेटलं तर राम- राम, म्हणतात. आणि एखाद्याला तपश्चर्या करायचे असेल तर तो ,राम -राम म्हणत असतो. असा हा राम शब्द आहे. हा शब्द मनोभावे उच्चारला तर वाल्याचा वाल्मिकीही होऊ शकतो. राम नामाचे दगडही सेतू पुल बांधताना सागरात तरंगले होते. असे सांगत
या संसारात पशुपक्षी ,सर्व काही आहे. पशु पक्षांनाही सुखदुःख, तसेच संतती होते. पण त्यांना नामस्मरण करता येत नाही. पण एकमेव मनुष्य,या मानवी जीवनात नामस्मरण करून आपले जीवन सार्थकी आपण लावू शकतो. मात्र या मानवी जीवनाचे महत्त्व अजूनही अनेकांना पटले नाही. या संसारातून तरुण जाण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी राम नामाची एक एक पायरी जीवनामध्ये चढणे गरजेचे आहे. इमारतीच्या मजल्याची पहिली पायरी व नववी पायरीची रुंदी बनवताना,( साईज )सारखीच असते. मात्र तिचे एक एक उंच पायरी गणित महत्त्व वाढत जाते. पहिल्या पायरीवर उडी मारली तर काही होत नाही .मात्र नवव्या पायरीवरून खाली उडी मारली तर नक्कीच जखम झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे प्रत्येक पायरीला जसे सारखे असूनही वेगवेगळे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे अध्यात्मातही अशाच पायऱ्या आहेत .हि नामस्मरणाची पायरी प्रत्येकाने या जीवनामध्ये रामनाम जप करून ,तप करून चढत जावी. तीच आपल्याला भवसागरातून तारुण नेईल. असे यावेळी सांगत आपली ही भारत भूमी, महाराष्ट्राची भूमी संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली आहे. येथे आपल्या मुलाला पाठीशी बांधून लढणारी झाशीची राणी, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार व नदीकिनारी घाट बांधणारी महाराणी अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ या रणरागिणी होऊन गेल्या, येथे श्री ज्ञानोबा, श्री तुकाराम, श्री साईबाबा असे अनेक संत होऊन गेले. ही देवांची भूमी आहे. येथे अनेक जण म्हणतात की, भारतातच संत व देव जन्माला आले अमेरिकेत का आले नाही.? पण त्यांना माहित नाही की , जेथे जमीन सुपीक तेथे पीक चांगले येते. ज्या मातेची कुस चांगली त्यांचे बाळही चांगलेच जन्माला येते. त्याचप्रमाणेच संत सनातन परंपरेची कूस धारण केलेली ही भारतमातेची भूमी आहे. त्यामुळेच येथे देव व संतांचा अवतार झाला आहे. जन्म झाला आहे. असे सांगत दृष्टांत देताना महाराज पुढे म्हणाले की ,असाच एका परदेशी नागरिकांनी स्वामी विवेकानंदांना तुम्ही परदेशात सुद्धा डोक्यावर भारतीय फेटा घालतात आणि पायात परदेशी चप्पल घालता?असा प्रश्न विचारला असता स्वामी विवेकानंद म्हणाले की, भारतीय फेटा हा भारतीय सनातन परंपरेचे प्रतीक आहे. ते डोक्यावरच राहते. पण तुमची ही चप्पल कितीही भारी असली तरी ती चप्पलच आहे. ती पायातच राहणार आहे. म्हणजेच परदेशी संस्कृतीपेक्षा भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. असे यातून त्यांनी सुचित करत पुढे म्हटले की, आपण सर्व या संत महात्म्यांच्या भारतात, महाराष्ट्रात जन्माला आलो आहे . त्यामुळे आपण खूप भाग्यवान आहोत. हे नेहमी ध्यानात ठेवा. काहीजण स्वतःला खूप ज्ञानी समजतात. पण तुमचे ज्ञान हे तुमची विद्ववत्ता दाखवत नाही तर तुमची नम्रता ही तुमची विद्ववत्ता दाखवत असते. जो ज्ञानी असतो, त्याचे ज्ञान वागण्यात दिसते. व ते वागण्यातच दिसायला हवे. उगाच ज्ञानीपणाची हवा डोक्यात जायला नको. येथे वरती फॅन आहे. पण मी खरा तुमचा फॅन आहे. वरचा फॅन तुम्हाला हवा देतो. तुम्ही त्यामुळे उत्साही आहात. व तुमच्यामुळे मी उत्साही आहे. मात्र फॅन ची हवा कमी झाली तर आपली हवा कमी होऊ देऊ नका. असे सांगत
आपण नेहमी राम नाम नेहमी कंठी असू द्यावे. तेच आपल्याला कामी येईल. राम नामाचं फळच महत्त्वाचं आहे. बाकी सर्व काही निष्फळ आहे. असं त्यांनी यावेळी सांगितले.
किर्तन संपल्यानंतर हभप ऋषिकेश महाराज चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. या दिवसाची पंगत देणाऱ्या गावातील जैन समाजातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच ओमेश जपे यांनी श्री साई सतचरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सुरू असलेल्या कीर्तन व दररोज महाप्रसाद व इतर धार्मिक कार्यक्रमांना गावातील सर्व समाजातील भाविक उपस्थित राहतात तसेच कीर्तनानंतर दिल्या जाणाऱ्या महाप्रसादासाठी सर्व समाजातील बंधूंचे सहकार्य मिळत आहे. वेगवेगळ्या दिवशी विविध समाजाकडून पंगत दिली जात आहे. यातून सर्व धर्म समभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे. या सर्व समाज बांधवांचे तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या कीर्तनकार महाराज, भजनी मंडळ ,भाविक भक्तांचे, पारायणाअर्थींचे त्यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
सावळीविहीर बु. श्री साई सतचरित्र पारायण व अखंड हरिनाम सप्ताह--
वर्ष तेविसावे,
---किर्तनसेवा- चौथे पुष्प--
0 Comments