श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असलेला अत्यंत पवित्र आणि फलदायी महिना मानला जातो.श्रावणी सोमवारचे महत्व तर खूपच आहे. या दिवशी केलेल्या पूजेने महादेवांची विशेष कृपा लाभते.मनोकामनापूर्ती होते. असे श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत व जुना आखाड्याचे स्वामी परमपूज्य संन्यासी आत्मारामगिरीजी महाराज यांनी सांगितले.
श्री नर्मदेश्वर सेवाधाम शिवकुटी निर्मळ पिंपरी येथे श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमात तिसऱ्या श्रावणी सोमवारी संपन्न झाला. यावेळी महाराजांनी साधक व शिवभक्तांना आशीर्वाद रुपी मार्गदर्शन करताना म्हटले आहे की, आज संकष्ट चतुर्थी, श्रावणी तिसरा सोमवार असून येथील श्री नर्मदेश्वर शंभू महादेव मंदिराचा वर्धापन दिन आहे.या विशेष दिनी श्री नर्मदेश्वराकडे सर्व साधकांना व सर्व शिवभक्तांना उत्तम आरोग्य सुख समाधानाचा लाभो, अशी प्रार्थना आहे. तर सर्वांची मनोकामना पूर्ण होवो. असा सर्वसाधारकांना, शिवभक्तांना आशीर्वाद देत,
हर हर महादेव घरघर महादेव,!!
बम बम बोले, मस्ती मे डोले,!!
नर्मदे हर- जिंदगीभर!! असा जय जयकार करत तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या व वर्धापन दिनाच्या सर्वांना आशीर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या.
राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील श्री नर्मदेश्वर सेवाधाम शिवकुटी येथे श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराचा चौथा वर्धापन दिन तिसऱ्या श्रावणी सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.
श्री नर्मदेश्वर सेवाधाम येथे श्री ओंकारेश्वर येथून भव्य दिव्य असे शिवलिंग येथे आणून निसर्गरम्य अशा पिंपरी निर्मळ येथील शिव कुटी येथे विधिवत पूजन करत स्थापना करण्यात आलेली आहे. अशा या मंदिरात दररोज जलाभिषेक, पूजन आरती केली जाते. तसेच सण ,उत्सव तसेच महाशिवरात्री व श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी तिसऱ्या श्रावणी सोमवारी 31 ऑगस्ट 2026 या दिवशी या श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराचा चौथा वर्धापन दिन श्री नर्मदेश्वर संन्यासी आत्मारामगिरीजी ट्रस्टच्या वतीने व महंत आत्मारामगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी श्रींना जलाभिषेक, नंतर पूजा, आरती, शिव आराधना करण्यात आली, दुपारी महंत आत्मारामगिरीजी महाराज यांचे प्रवचन झाले. मंहत आत्मारामगिरीजी महाराज यांनी श्रावण व श्रावणी सोमवारचे महत्व यावेळी सांगत शिवमहिमा व शिव चमत्कारांची महती थोडक्यात विषद केली. त्यानंतर खिचडीचा महाप्रसाद झाला. नंतर वैजापूर येथील साधकांचा भजनाचा सुंदर कार्यक्रम संपन्न झाला. या वेळी उपस्थित साधकांना मंहत आत्माराम गिरीजी महाराज यांनी तिसरा श्रावणी सोमवार असल्याने प्रसाद म्हणून शिवरुद्राक्ष दिले. व सर्वसाधारण आशीर्वाद रुपी मार्गदर्शन केले. यावेळी ह भ प हरिभाऊ गुंजाळ, ह भ प सावंत महाराज, ह भ प रतन महाराज इंगळे, संभाजीनगरच्या महिला साधक आदींसह उपस्थित काही साधकांनी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त करत आपल्याला आलेली अनुभूती यावेळी उपस्थितांना सांगितली. या सर्व कार्यक्रमांना राहाता, वैजापूर तालुक्यासह संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच पिंपरी निर्मळ परिसरातील साधक, शिवभक्त उपस्थित होते . तसेच ह भ प मनोज बिडवे, महाराज,हभप सुभाष पोपळघट आदीसह अनेकांनी या वर्धापन दिनानिमित्त येथे भेट देऊन दर्शन घेतले.
0 Comments