श्री साईबाबा समाधी मंदिरात सुमारे एक कोटी 20 लाख रू.च्या नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना



उत्तर प्रदेशातील आग्रा येथील साईभक्तांकडून हा चांदीचा नंदी व बेस; अर्पण!



शिर्डी( प्रतिनिधी)- श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर उत्तर प्रदेशातील आग्रा येथील साईभक्तांकडून श्री साईबाबांच्या चरणी ५४ किलो ०६५ ग्रॅम वजनाचा चांदीचा नंदी व बेस तसेच ९८ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचे २२ कॅरेट सोन्याचे शिंग व बिंदी अशी देणगी प्राप्त झाल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
श्री साईबाबा समाधी मंदिरातील श्रींच्या मूर्तीसमोरील जुन्या नंदीचे विधिवत उत्तरपूजन करून, श्री गणेश चतुर्थीच्या पवित्र मुहूर्तावर नव्याने अर्पण करण्यात आलेल्या नंदीची धार्मिक विधीपूर्वक प्रतिष्ठापना अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.
आग्रा येथील साईभक्तांनी अर्पण केलेल्या चांदीच्या नंदीचे वजन २७ किलो ०२७ ग्रॅम असून, त्याचे देणगीमूल्य रु. ६० लाख २७ हजार ०२१ इतके आहे. तसेच नंदीसाठी अर्पण करण्यात आलेल्या चांदीच्या बेसचे वजन २७ किलो ०३८ ग्रॅम असून, त्याचे देणगीमूल्य रु. ६० लाख २९ हजार ४७४ आहे. अशा प्रकारे चांदीचा नंदी व बेस यांचे एकूण वजन ५४ किलो ०६५ ग्रॅम असून, एकूण देणगीमूल्य रु. १ कोटी २० लाख ५६ हजार ४९५ इतके आहे.
या चांदीच्या नंदीला विशेष धार्मिक व अलंकारिक स्वरूप देण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचे शिंग (शिंग कव्हर) व सोन्याची बिंदी देखील अर्पण करण्यात आली आहे. सोन्याच्या शिंगाचे वजन ६९ ग्रॅम ३०० मिलीग्रॅम, तर सोन्याच्या बिंदीचे वजन २९ ग्रॅम ३०० मिलीग्रॅम असून, दोन्ही अलंकारांचे एकूण वजन ९८ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम आहे. या सोन्याच्या अलंकारांचे एकूण देणगीमूल्य रु. १३ लाख ८५ हजार १३२ इतके आहे.
 या साईभक्तांनी यापूर्वीही श्री साईबाबांच्या चरणी विविध स्वरूपातील सोन्या-चांदीच्या वस्तू श्रद्धापूर्वक अर्पण केल्या आहेत. श्री साईबाबांवरील अढळ श्रद्धेतून सातत्याने करण्यात येणारे त्यांचे हे योगदान साईभक्तीची समृद्ध परंपरा अधोरेखित करणारे आहे.
साईभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या या अमूल्य दानातून श्री साईबाबांच्या *‘श्रद्धा आणि सबुरी’* च्या संदेशाची अनुभूती अधिक दृढ होत असून, भक्ती, समर्पण आणि सेवाभावाची ही परंपरा अखंड सुरू आहे.
या साईभक्तांच्या विनंतीवरून त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

Post a Comment

0 Comments