दिलीप शिंदे
सोयगाव, दि. १६ -- अजिंठा पर्वतरांगेतील लेण्यांच्या पाठीमागील डोंगरात वसलेले स्वयंभू रुद्रेश्वर महादेव मंदिर हे धार्मिक श्रद्धेसोबतच पुरातन शिल्पकलेचा अनमोल ठेवा मानले जाते. अजिंठा लेण्यांच्या कालखंडाशी या मंदिराचा संबंध असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो. मात्र, ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या या स्थळाकडे पुरातत्त्व विभागासह संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाविकांकडून केला जात आहे.
सोयगाव तालुक्यातील गलवाडा गावापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिराचा परिसर निसर्गरम्य असून, डोंगर-दऱ्या, दाट जंगल आणि प्राचीन दगडी शिल्पांनी परिसराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. शेकडो वर्षांपूर्वी गाई-म्हशी चारणाऱ्या गुराख्यांना या मंदिराचा शोध लागल्याची आख्यायिका स्थानिकांकडून सांगितली जाते.
-----कोरीव शिल्पकलेचा अनोखा नमुना---
मंदिरात प्रवेश करताच सुमारे सहा फूट उंचीची गणेशमूर्ती, रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती, कालभैरव तसेच नरसिंहाच्या कोरीव मूर्ती लक्ष वेधून घेतात. पश्चिमेकडे नंदीची भव्य मूर्ती असून, त्याच्या उत्तरेस स्वयंभू रुद्रेश्वर शिवलिंग आहे. मंदिराच्या दगडी रचनेतून तत्कालीन शिल्पकलेची प्रगल्भता दिसून येते.मंदिराच्या परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर जाणवणारे तुलनेने समान तापमान. दररोज विशिष्ट वेळी डोंगराआडून येणारे सूर्यकिरण शिवलिंगावर पडत असल्याचे भाविक सांगतात. या नैसर्गिक घटनेला भक्तांकडून ‘सूर्यकिरणांचा अभिषेक’ मानले जाते.
---२०० फुटी धबधबा अन् तीर्थकुंडाची दुरवस्था-----
रुद्रेश्वर मंदिराच्या माथ्यावरून सुमारे २०० फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा हे या परिसराचे प्रमुख आकर्षण आहे. मात्र, काळाच्या ओघात धबधब्याची ‘सोंड’ तुटल्याने त्याचे मूळ सौंदर्य बाधित झाले आहे. धबधब्याच्या खाली असलेले ऐतिहासिक तीर्थकुंडही दगड, माती व गाळाने मोठ्या प्रमाणात भरले आहे.
धबधबा व तीर्थकुंड हे धार्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असताना त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याने भाविक व स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पुरातन वास्तू व परिसराचे तज्ज्ञांकडून सर्वेक्षण करून आवश्यक संवर्धनाची कामे करण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.
-----श्रावणात भाविकांची मोठी गर्दी------
श्रावण महिन्यातील सोमवार तसेच महाशिवरात्रीच्या पर्वणीला रुद्रेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. धबधब्याखाली स्नान केल्यास संततीप्राप्ती होते, अशी श्रद्धा अनेक भाविकांमध्ये आहे. रुद्राभिषेक व जलाभिषेक करून मनोभावे प्रार्थना केल्यास मनोकामना पूर्ण होते, अशीही भक्तांची श्रद्धा आहे.
---मूलभूत सुविधांचा अभाव---
धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या या स्थळावर आजही पुरेशा मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची खंत भाविक व्यक्त करतात. मंदिराकडे जाण्यासाठी चांगला रस्ता, सभामंडप, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, स्वच्छता तसेच सुरक्षिततेच्या सुविधांची गरज आहे.इतका सुंदर आणि पुरातन वारसा असतानाही रुद्रेश्वर मंदिराचा अपेक्षित विकास झालेला नाही. धबधबा आणि तीर्थकुंडाची दुरवस्था तातडीने दूर करून या परिसराच्या संवर्धनासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी भाविकांनी केली आहे.
0 Comments