शिर्डी (प्रतिनिधी)
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी आणि माईर्स विश्वराज हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले विशेष बाल हृदयरोग तपासणी व उपचार शिबिर शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शिर्डी येथे उत्साहात संपन्न झाले.
या शिबिरात बाल हृदयरोग तज्ज्ञांकडून एकूण ४० बालरुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती आवश्यक असलेल्या ०९ बालरुग्णांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, या माध्यमातून गरजू बालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बाल हृदयरोगाचे रुग्ण तुलनेने दुर्मीळ असतात. त्यामुळे एकाच शिबिरात ४० बालरुग्ण तपासणीसाठी उपलब्ध होणे हे या शिबिराचे मोठे यश असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले. वेळेवर निदान झाल्यास बालकांना योग्य उपचार मिळू शकतात, यासाठी अशा आरोग्य शिबिरांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था आणि माईर्स विश्वराज हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजातील गरजू बालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजातील गरजू रुग्णांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी यापुढील काळातही अशाच प्रकारचे विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
तसेच या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी शिबिरातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, कर्मचारी आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश मिस्तरी यांनी केले. वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले. यावेळी डॉ. आशिषकुमार बनपुरकर, डॉ. संदीप देवरे, डॉ. निलेश जाधव, डॉ. श्रेयस पोद्दार, आधीसेविका मंदा थोरात, सुनील लोंढे यांच्यासह श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments