राखीच्या धाग्यापलीकडचं नातं… मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनने २६० बहिणींच्या मनाला दिला ‘आपलेपणाचा स्पर्श

राहाता तालुका प्रतिनिधी 

शिवलीलामृत पारायणाच्या सांगतेदिनी मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनचा ‘सेतू संगम’; रक्षाबंधनानिमित्त २६० बहिणींचा भावस्पर्शी सन्मान
राहाता : राहाता तालुक्यातील वीरभद्र मंदिर येथे सुरू असलेल्या शिवलीलामृत पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी, रक्षाबंधनाचे औचित्य साधून मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनच्या वतीने ‘सेतू संगम’ या उपक्रमांतर्गत पारायणासाठी उपस्थित असलेल्या २६० बहिणींना साड्यांचे वाटप करण्यात आले.

शिवलीलामृत पारायणाची सांगता, रक्षाबंधनाचा पवित्र सण आणि महिलांच्या सन्मानाची भावना यांचा सुंदर संगम या उपक्रमातून घडून आला. साडी ही केवळ भेट नसून, ‘तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाच्या आहात’ हा भावनिक संदेश देणारा सन्मानाचा स्पर्श असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीला मिळणारी आपुलकी, सन्मान आणि स्वीकाराची भावना तिच्या मनात सकारात्मकता निर्माण करते. याच विचारातून मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनने ‘सेतू संगम’च्या माध्यमातून वस्तू देण्यापेक्षा भावना देण्याला प्राधान्य दिले. २६० बहिणींच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे आणि समाधानाचे भाव या उपक्रमाचे खरे यश ठरले.

शिवलीलामृताच्या आध्यात्मिक वातावरणात आणि रक्षाबंधनाच्या प्रेमळ भावनेतून मनाला मनाशी जोडणारा हा ‘सेतू संगम’ अनुभवता आला. सेवा, सन्मान आणि माणुसकी यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.

या उपक्रमासाठी मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनचे डॉ. येलम, श्री. किरण वाणी, डॉ. संकेत येलम, पल्लवी नरारे, श्री. नेमीचंदजी लोढा( सचिव श्री गणेश शिक्षण संस्था कोराळे), गीता येलम, डॉ. परमेश चव्हाण, सुष्मिता चव्हाण, श्री तुषार पगार, श्री पोपट गायकवाड, पृथ्वीराज दिवटे, प्रतीक्षा जाधव तसेच इतर सहकारी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच वीरभद्र शिवप्रतिष्ठान, राहाता यांचे श्री. बाळासाहेब सोनटक्के, श्री. निवृत्ती बनकर, श्री. भालचंद्र लोंढे आणि इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शिवलीलामृताच्या सांगतेदिनी मिळालेली ही भेट साडीची असली, तरी तिच्यामागील भावना होती—सन्मानाची, आपलेपणाची आणि माणुसकीची. म्हणूनच ‘सेतू संगम’चा हा उपक्रम २६० बहिणींच्या मनात आनंदाची आणि आपलेपणाची आठवण कायम ठेवणारा ठरला.

Post a Comment

0 Comments