श्री नर्मदेश्वर सेवाधाम येथे श्रावण महिन्यात मोठ्या भक्तीमय वातावरणात दररोज शिवपूजा व आराधना

शिर्डी (प्रतिनिधी)
महाराष्टात श्रावण महिना मोठ्या उत्साहात सुरू झाला असून श्री नर्मदेश्वर सेवा धाम निर्मळ पिंपरी येथेही श्री नर्मदेश्वर आत्माराम गिरीजी ट्रस्ट च्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमासह मोठ्या भक्तीमय वातावरणात शिव आराधना केली जात आहे. हर हर महादेव- घर घर महादेव, बम बम भोले, मस्ती में डोले! असे म्हणत येथे श्री नर्मदेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवभक्तांकडून पुजा अर्चा होत आहे.
श्री नर्मदेश्वर सेवाधाम चे महंत संन्यासी आत्माराम गिरीजी महाराज यांचा हरिद्वार दौरा नुकताच मोठ्या आध्यात्मिक वातावरण संपन्न झाला असून ते श्रावण सुरू होताच श्री नर्मदेश्वर सेवा धाम या आपल्या आश्रमात आले असून येथे श्रावण महिन्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.
महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले की, भारतात श्रावण महिन्याला अध्यात्मिक दृष्टीने खूप मोठे महत्त्व आहे.श्रावण महिन्याला 'शिवाचा महिनाही' म्हटले जाते. भगवान शिवाचा हा प्रिय महिना आहे. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनातून निघालेले हलाहल (विष) भगवान शंकराने प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले. या विषाच्या दाहकतेमुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना 'नीलकंठ' असे नाव मिळाले. विषाचा दाह कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जलाभिषेक केला. ही घटना श्रावण महिन्यात घडली होती, त्यामुळे या संपूर्ण महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेक केल्यास भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.सोमवार हा भगवान शंकराचा वार मानला जातो, त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याला "श्रावणी सोमवार" असे म्हणतात. या दिवशी भाविकांनी उपवास , भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर बेलपत्र, फुले, दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल अर्पण करून पूजा (अभिषेक) केल्याने मनोकामना पुर्ती होते.
श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने कौटुंबिक सुख, समृद्धी आणि मानसिक शांती प्राप्ती होते. श्रावणी सोमवारच्या व्रतामध्ये "शिवामूठ" वाहण्याची एक सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ वाहून आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते.
शिवामूठ म्हणजे 'शिवासाठी एक मूठभर धान्य'. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी वेगळे धान्य मूठभर घेऊन ते शिवलिंगावर अर्पण केले जाते. यामागे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यागाचा भावही दडलेला असतो. असा हा अध्यात्मिक दृष्टीने मोठा फलदायी प्रत्येकाला ठरणारा श्रावण महिना सध्या सुरू झाला असून या महिन्यात प्रत्येकाने मोठ्या भक्ती भावाने शिव आराधना करावी. असे यावेळी महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments