शिर्डी -राहाता ( राजकुमार गडकरी)-
आषाढ महिना जसा जवळ येतो तसा वारकरी व पांडुरंग भक्तांमध्ये पंढरीच्या वारीची आस लागून राहत असते. आषाढी एकादशला श्री क्षेत्र पंढरपूरला श्री पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील, परराज्यातील लाखोच्या संख्येने भाविक वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या शहरांमधून खेड्यापाड्यातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे पायी दिंडीद्वारे निघत असतात.
अशा या पंढरपूर पायी दिंड्यां आता पंढरपूरकडे जाताना दिसू लागल्या आहेत. मानवी जीवाच्या कल्याणासाठी आत्मिक उद्धारासाठी, समतेसाठी आणि परमेश्वर प्राप्तीसाठी पायी दिंड्या या वारीतून श्री पांडुरंगाकडे मोठ्या भक्ती भावात जात आहेत. वारकरी परंपरा ही अनेक वर्षापासून चालत आलेली धार्मिक, अध्यात्मिक अशी पृथ्वीवरील एक मोठा अभूतपूर्व पर्वणी आहे व या पर्वणी सोहळ्यामध्ये लाखोच्या संख्येने वारकरी श्रीमंत -गरीब,उच-नीच, कोण छोटा कोण मोठा, कोण कोणत्या धर्माचा ,कोणकोणत्या जातीचा याचा विचार न करता सर्व एकदिलाने पांडुरंगाचे लेकरे समजून या दिंडीमध्ये पायी चालत असतात.
अशा पायी दिंडी आता रस्त्याने पंढरपूरकडे जाताना दिसत आहेत. सर्वात पुढे भगव्या पताकाधारी, त्यामध्ये डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेला महिला, टाळ मृदंगाच्या निनादात भजन करणारे वारकरी, श्री पांडुरंगाचा सजवलेला व भजने ,अभंग गात चाललेले भाविक महाराष्ट्राच्या रस्त्या रस्त्यावर सध्या दिसून येत असून हा भक्तिमय सोहळा मोठा आनंददायी व सर्वांनाच या भक्तीरसात न्हावून टाकणारा असा असून या भक्तीरसामध्ये सर्वजण आता डुंबून गेल्याचे दिसत आहे. अशा या अनेक छोट्या मोठ्या श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांपैकीच श्रीक्षेत्र देर्डे कोराळे,(चांदेकसारे, घारी सावळीविहीर )येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज यांचा पायी दिंडी सोहळ्याचे सोमवार 13 जुलै 2026 रोजी चांदेकसारे येथून पंचपावली करून मंदिराला प्रदर्शिणा मारून व श्री पांडुरंगाचे प्रतिमेचे व विना पूजन करून श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान झाले. या दिंडीचे हे 52वे वर्ष आहे. मोठ्या भक्ती भावात सद्गुरु नारायणगिरीजी महाराज व कै. गंगाधर महाराज होन यांच्या आशीर्वादासह ह भ प श्री विश्वनाथ महाराज होन चांदेकसारे व ह भ प श्री भानुदास महाराज माळी, शेण वडगाव , तसेच हभप संजय महाराज लोंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र पंढरपूर कडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. तेथे अनेकांनी सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.चांदेकसारे येथे सय्यद नूर शेख रमजान शेख तसेच कल्याण शिवराम होन व ज्ञानेश्वर होन यांच्यातर्फे चहा नाश्ता तसेच आप्पासाहेब गुजर, निरंजन होन ,विठ्ठलराव होन यांच्यातर्फे दुपारचे भोजन झाले. या दिंडीमध्ये देर्डे कोऱ्हाळे, चांदेकसारे ,घारी ,सावळीविहीर बुद्रुक खुर्द, जेऊर कुंभारी, शेण वडगाव , राहुरी येथील वारकरी आहेत.हि दिंडी सावळीविहीर फाट्याजवळ आल्यानंतर ह भ प भारतराव जमधडे पा.यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम झाला तसेच येथे चहा नाश्ता झाला. यांचा अशोक कुर्हे यांनी सत्कार केला. तेथे राजेंद्र सुरासे,शिवाजी आगलावे, बाबासाहेब जपे,दिलीप कापसे, विजू जमधडे आदी अनेक जण वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यानंतर सर्व दिंडीतील वारकरी हे मोठ्या भक्ती भावात व भजने गात नगर मनमाड रस्त्याला लागून पुढे सावळीविहीर ,निमगाव व शिर्डीत साईबाबांच्या मंदिरात जाऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन राहता येथे आले. राहाता येथील श्री नवनाथ महाराज मंदिरामध्ये या दिंडीचा पहिला मुक्काम झाला. येथे नवनाथ भक्त मंडळ,हभप जनार्दन महाराज गाडेकर, नितीन गाडेकर, प्रकाश गाडेकर यांच्या घराच्या प्रांगणात भजन होऊन चहा पाणी झाला. अन्नदाते गाडेकर यांचा वारकरी राजेंद्र गडकरी यांनी श्रीफळ देऊन सन्मान केला.श्री नवनाथ महाराजांच्या मंदिर प्रांगणात हरिपाठ झाला. श्री सद्गुरु नारायण गिरीजी महाराज व कै. गंगाधर महाराज होन त्यांचे पूजन करण्यात आले. आरती झाली.व नवनाथ भक्त मंडळ त्यांच्यातर्फे देण्यात आलेला सायंकाळचा महाप्रसाद( पंगत)घेतल्यानंतर सर्वजणांनी दिंडीतील येथे पहिला मुक्काम केला. महाप्रसादाच्या पूर्वी अन्नदात्यांचा हभप संजय महाराज लोंढे यांनी श्रीफळ देऊन सत्कार केला व धन्यवाद मानले. तर हभप विश्वनाथ महाराज होन यांचा नवनाथ मित्र मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.राहाता येथील हे भव्य दिव्य श्री नवनाथ मंदिर असून सर्वांनी येथे दर्शन घेतले. येथे श्री गुरुदेव दत्त मंदिर, श्री मच्छिंद्रनाथ, श्री गोरक्षनाथ, श्री चौरंगीनाथ, श्री वटसिद्ध नागेश नाथ, श्री चरपटीनाथ, श्री गहिनीनाथ, श्री जालिंदरनाथ, श्री कानिफनाथ, श्री रेवन नाथ असे नवनाथांच्या सुंदर व मनमोहक मूर्ती असून श्री मायंबा देवस्थानही आहे. तसेच परिसरात शिवमंदिर व इतर मंदिर आहेत. प्रसन्न असे येथे अध्यात्मिक वातावरण आहे. येथे सर्वांनी मंदिरात मनोभावे दर्शन घेतले. पहिला दिवस असल्यामुळे दिंडीतील सर्वांची खुशाली विचारत व परत एकदा पांडुरंगाच्या कृपेने या पायी दिंडीत सर्वजण पुन्हा एकत्र आले व भेटले. त्यामुळे भक्ती भावाने एकमेकांना अलिंगन देत, माऊली म्हणत एकमेकांचे दर्शन घेत मोठ्या आनंदाने रात्री पांडुरंगाचा जय जय करत विश्राम केला. कारण पहाटेच पाच वाजता श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाताना गुहाकडे दिंडीचे प्रस्थान होणार होते. सर्वांनी जय हरी करत पहिल्या दिवशीच्या पायी प्रवासामुळे काहीसे थकल्यामुळे आराम केला. दरवर्षीप्रमाणे दिंडीमध्ये जाण्याची महिनाभरापासून लागलेली आस आता दिंडी पायी निघाल्यामुळे पूर्ण होऊन सर्वांचे मन आनंदित झाल्याचे दिसून येत होते.
0 Comments