वारी पंढरीची ( सहावा दिवस)कोकणगाव ( राजकुमार गडकरी याज कडून)

राजकुमार गडकरी 

-दरवर्षी वारकऱ्यांना पंढरपूर वारीची एक अलौकिक ओढ असते. घर-दार, पोर-बाळ, संसार सुखाचा, भौतिक गोष्टींचा त्याग करून वारकरी पायी पंढरीला निघतात. अशीच सद्गुरु नारायणगिरीजी महाराज पायी दिंडी सोहळा देर्डे कोऱ्हाळे , चांदेकसारे, सावळीविहीर येथून श्रीक्षेत्र पंढरपूर कडे निघाला आहे.

 दिंडीतील प्रत्येक वारकऱ्यांची श्री पांडुरंगावर मोठी श्रद्धा असल्याने आपल्या समवेत विठुराया माउलीही चालत असल्याचा सर्वांना मनोमन मोठा विश्वास असतो व या विश्वासाच्या जोरावर श्रद्धेच्या जोरावर एक- एक किलोमीटर प्रत्येक जण पायी दिंडी चालत अंतर काटत असतो.सर्वांची काळजी घेण्यासाठी विठुराया दिंडीत असतात. वाटेत येणारे सगळे अनुभव स्वीकारून, सर्व परिस्थितीत आनंद मानून वारकरी फक्त दर्शनाच्या ओढीनं, टाळ आणि नामजपाचा जयघोष करत चालत असतात.

 आमची दिंडी ही हभप विश्वनाथ महाराज होन, ह भ प संजय महाराज लोंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली हभप राजूभाऊ पवार, भीमा वरपे पत्रकार राजेंद्र गडकरी, सागर जाधव कैलासराव जपे, सतीश जपे ,अशोक कुऱ्हे, दादासाहेब पवार, पानगव्हाणे साहेब, जावळे, ह भ प भाना माऊली, मच्छिंद्र माळी, गोरख माळी, जालिंदर मोरे, शिवाजी मोरे, आदीसह अनेक‌ वारकरी आंबिलवाडी येथून निघून मजल दरमजल करत घोगरगाव येथे येऊन तेथे हभप जयसिंग गारुडकर यांच्या दुकानाच्या समोर भजन झाले. जयसिंग गारुडकर यांच्या तर्फे पाव भजीचा नाश्ता झाला. जयसिंग गारुडकर यांचा दिंडीतर्फे सत्कार करण्यात आला. तर गारुडकर यांनी दिंडीला श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन पुढच्या वर्षीसाठी नाश्त्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर दिंडी हरी नामाचा जप करत मांदळी येथे पोहोचली. येथे अनेक वर्षापासून फक्त श्वासावर असणारे महान संत आत्माराम गिरीजी महाराज व तेथील मंदिरात दर्शन घेऊन येथील कोऱ्या चहाचा प्रसाद येथे थोडी विश्रांती घेऊन तिथून जवळच असणाऱ्या थेरगाव येथे दुपारी ह भ प पुंडलिक धोंडीबा खुळे सर यांच्याकडे दिंडी गेली. ते भजन झाले. येथे पंढरपूर वरून परत जाताना विजय जमधडे, मिलिंद जमधडे, गोरख कणसे, भिकाभाऊ खोंड,आदी झाले त्यांची भेट झाली. भजनाला व आरतीलाही ते उपस्थित होते. येथे दुपारचे भोजन झाले. त्यानंतर येथे खुळे सरांचा सत्कार करण्यात आला. नंतर हळूहळू दिंडी कोकणगाव कडे निघाली. वाटेत अनेक छोट्या मोठ्या दिंड्या एकामागे एक चालत होत्या. वैजापूर येथील काही उद्योजक यांनी दिंड्यांना भेट देऊन भेटवस्तू दिल्या. नंतर मिरजगावच्या अलीकडे तीन किलोमीटर असणाऱ्या कोकणगाव येथे दिंडी पोहोचल्यानंतर दिंडीचे जोरदार स्वागत झाले. तत्पूर्वी पुणे येथील वारकऱ्यांनी दिंडीला भेट दिली. कोकणगाव येथे हभप गुलाबराव राजाराम गवारे व राहुल गवारे यांच्याकडे सायंकाळी भजन व हरिपाठ, आणि यजमानांच्या हस्ते आरती झाली. तेथे रात्रीचे भोजन झाले. येथील श्री हनुमान मंदिरात सर्वजण झोपले व येथे मुक्काम झाला. तत्पूर्वी मिरजगाव येथील हभप संजय महाराज लोंढे यांचे बंधू हे सकाळी मिरजगावला चहा नाश्ता दिंडीला देणार असल्याचे निमंत्रण देण्यासाठी आले होते. त्यांचा श्रीफळ देऊन दिंडीतर्फे ह भ प भाना माऊली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शनिवारी रात्री शिर्डीचे खरात्रीभाऊसाहेब वाकचौरे हे पंढरपूर वरून करमाळ्याकडे रात्री आले होते. मात्र रात्रीची पावसाची बुरबुर व रात्र झाल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यांच्याबरोबर भाऊसाहेब मते होते. त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. त्यांनी दिंडीला शुभेच्छा दिल्या.अनेक दिंड्यांना त्यांनी भेटी दिल्या.
 दिंडीतील एक एक दिवस जात होता तस तसा पंढरपूरचे अंतरही पायी चालून चालून कमी होत होते पंढरपूर जवळ येत होते. तसतसे चालण्यामधला उत्साह वाढत होता. लवकरच चंद्रभागेचे स्नान होणार, पुंडलिकाचे नामदेव पायरीचे व पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन होणार, प्रदक्षिणा होणार, पांडुरंगाची भेट होणार या आशेने सर्वजण आता मोठ्या उत्साहाने भक्ती भावाने व हरिनामाचा जप करत दर्शनाची मनात आस धरून पांडुरंगाकडे कुच करत होते.तर. काहीजण घरी बसूनही मोठ्या भक्ती भावाने पूर्वीचे आपले
 वारीचे दिवस आठवून माझ्या देवाचे दर्शन मी आता मनातूनच घेत आहे, असे प्रत्येक जण मनातून वारी अनुभवत असतात. तर काही वारीला न आलेले भाविकही सध्याच्या आधुनिक युगात मोबाईल टीव्ही इंटरनेटवर अनेक दिंड्यांचे लाईव्ह प्रक्षेपण पाहून आपणही जणू दिंडीत सहभागी असल्याचा भक्तिभावाने घरात बसून आनंद घेत होते. वारकऱ्यांचे नातेवाईकही घरून टीव्हीवर विविध दिंड्यांचे लाईव्ह प्रक्षेपण पाहून आपल्या नातेवाईक वारकऱ्यांना फोन करून दिंडीतील आनंद, दिंडीतील खुशाली विचारात होते.

प्रत्यक्षात वारीत गेलेल्या वारकऱ्यांना या दिंडीच्या दिवसांत एक वेगळाच उत्साह जाणवत असतो. हे बळ परमेश्‍वरच देत असतो.वारीत सेवेसाठी सगळे तत्पर असतात. घरी आपली एवढी कोणी काळजी घेणार नाही, एवढी वारीत काळजी घेतली जाते. गावोगावची अनेक मंडळी वारीची वाट पाहत असतात. दिंडीत किंवा दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा रस्त्याने कुणी नातेवाईक नसते. सर्वच अनोळखी असतात. पण सगळे एकमेकांना वारीत भेटल्यावर अलंघन देतात .माऊली म्हणतात .दर्शन घेतात. दरवर्षीच्या या वारीने ही माणसं आजन्म एकमेकांचे स्नेही बनतात. काहींचं तर काळजाच्या पलीकडचं नातं तयार होतं. कोण कुठली माणसं, पण एकमेकांना या दिंडीत भेटण्यासाठी आतुर झालेली असतात.
ना कोणत्या जातीची, ना पंथाची... माउली म्हणत वारकरी आपुलकीनं एकमेकांची विचारपूस करतात आणि मनसोक्तपणे चालत राहतात. व एक एक दिवस दिंडीतला जातो.तस तसी
पंढरीनाथाच्या दर्शनाची ओढ वाढत जाते. ती एक विलक्षण ऊर्जा दिंडीमुळे शरीरात निर्माण होत असते मनामनात घट्ट होत असते.ही ऊर्जा , दिंडीतील अनुभव दिंडीतील साक्षात्कार चमत्कार पुढील वारीपर्यंत वर्षभर मनामनात बिंबवून राहतात.काहींचे वारीत वेगवेगळ्या कारणाने जाणे होत नाही. मग ही माणसे वारी संसारातच अनुभवतात. मन नेहमी परमेश्‍वर आराधनेत ठेवून, सतत सर्वांशी मोठ्या मनाने वागून संसारातही परमार्थ करणारी माणसे पाहिली आहेत. टीव्हीवर मोबाईलवर लाईव्ह दिंडीचे प्रक्षेपण पाहून अनेक जण घरी बसल्या भक्ती करतात. तर कोणी रस्त्याने जाणाऱ्या दिंड्यांना , वारकऱ्यांना चहा नाश्ता जेवण फराळ पिण्याचे पाणी देऊन सेवा करतात. अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी मोफत औषधे वाटप केली जातात. वारकऱ्यांच्या सेवेतही पांडुरंगाची सेवा समजली जाते. असा हा अद्भुत वारीचा सोहळा या जगाच्या पाठीवर कोठेही नाही. असा या सोहळ्याचा आनंद सर्वच छोट्या-मोठ्या दिंड्यांमधील वारकरी सध्या घेत आहेत. आम्हीही सद्गुरु नारायणगिरीजी महाराज पालखी सोहळ्याच्या दिंडीत श्री क्षेत्र पंढरपूर कडे जात असताना पायी वारीचा भक्तिमय सोहळा अनुभवत आहोत व हा अनमोल असा आनंद मोठ्या भक्ती भावाने घेत आहोत. व जय हरी चा जप करत आहोत.

Post a Comment

0 Comments