दिलीप शिंदे
सोयगाव दि.१७- -कोरोनाच्या काळा नंतर अहिल्यानगर येथील एका वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापकाने राज्यातील डोंगरात आढळणाऱ्या दुर्मिळ अमरकंदा बद्दल माहिती देणारा व सदर कंद मणक्याचे आजार, संधिवात,हाड दुखणे व आयुष्य चिरतरुण होते असा या कंदाबद्दल एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता.
तेव्हापासून राज्यभर तथाकथित वन तस्कर व गुगल पंडित सक्रिय झाले आणि जंगलातील उपयुक्त असे अमरकंद काढून त्याची अव्वाच्या सव्वा दराने विक्री व खरेदी सुरू झाली. केळगाव, घटांब्री, तोंडापूर जंगल, अजिंठा लेणीचा परिसर, नागद, गौताळा रेंज,मनुदेवी या अजिंठा डोंगर रांगेतील भागात मोठ्या प्रमाणामध्ये सिल्लोड तालुक्यातील घटांब्री येथील पाच ते सहा वनतस्कर कोऱ्हाळा तांडा, आधारवाडी, सिरसाळा तांडा व आसपासच्या गावातून हे अमरकंद स्थानिक लोकांना डोंगरात पाठवून विकत घेऊ लागले. याबाबतची माहिती वन्यजीव व वनस्पती संवर्धक व सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. संतोष पाटील यांना मिळाली. त्यांनी तात्काळ उपमुख्य वनसंरक्षक सुवर्ण माने प्रादेशिक वन विभाग छत्रपती संभाजीनगर यांना चार दिवसापूर्वी आधी फोन करून व नंतर लेखी तक्रार देऊन त्यानुसार सोयगाव वनपरिक्षेत्रचे वनपाल सुभाष नागरे यांनी कारवाईस सुरुवात केली. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे वन मजूर, वनरक्षक, वनपाल हे केळगावच्या जवळ असलेल्या डोंगरात सदर तस्करांना शोधत गेले व डोंगरात अमरकंद खोदून काढताना तीन जणांना त्यांच्या हत्यार व मोटरसायकल सह पकडले दोन मोटरसायकली व पाच किलो अमरकंद ही जप्त करण्यात आले. कोराळा तांडा येथे बहुतांश लोकांकडे घरी २० ते ३० किलो पर्यंत अमरकंद असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. गत मे व जून या दोन महिन्यात संबंधित वन तस्करांनी दोन ते चार टन इतके अमरकंद या जंगलातून स्वतः काढून व स्थानिकांना उत्तेजित करून काढून नेले असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान अमरकंद हे "युलोपिया ऑर्किड "नामक ग्राउंड ऑर्किड म्हणजे जमिनीवर होणारे परजीवी कंद आहे.यास पावसाळ्याच्या सुरुवातीस सुंदर भडक गुलाबी फुल उमलतात.याची पाने हळदीसारखी दिसतात म्हणून बऱ्याचदा गैरसमजुने जंगली हळदचे कंद म्हणून ही याची तस्करी झालेली आहे. सदर ऑर्किडला मे महिन्याच्या शेवटी फुलं येतात.यास भडक रंग व मधुर सुगंध असतो.त्यामुळे अनेक मधमाशा,गांधील माशा,फुलपाखरे या कडे पराग वेचण्यास आकर्षित होतात. ज्यावेळी रानामध्ये पूर्ण जंगल सुष्क असते, त्यावेळेस मधमाशा, फुलपाखरे यांना जगवण्याचे काम हे अमरकंद करते. या कंदाच्या रान वनस्पती च्या पानांवर "'डार्क ग्रास ब्ल्" व निलगिरी टीट' या जातीचे फुलपाखरे अंडी घालून आपला जीवनक्रम आरंभ करतात.म्हणजे तो त्यांचा 'होस्ट प्लांट' आहे. जंगलातील रानडुक्कर, हरीण, काळवीट,ससे, सायाळ व इतर वन्यजीव यांना अन्न पुरवणारा हा अमरकंद आज मृत्यूच्या शैय्येवर वनतस्कर व स्थानिकांनी पोचवला आहे."साइटस "या वन्यजीव अभ्यासक अंतरराष्ट्रीय संस्थेने ही अमरकंदाच्या देशातील घटत्या संख्या व तस्करी बद्दल चिंता व्यक्त केली आहे.यापुढे अशी तस्करी होऊ नये म्हणून डोंगरा लगतच्या गावोगावी शासन निर्देशीत व ग्रामपंचायतच्या वन समित्या समर्थ करण्यास आपण प्राधान्य देऊ असे अभिनव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.संतोष पाटील यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
0 Comments