कबड्डी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्राचार्य काळे यांचा राज्यस्तरीय सन्मान



 टाकळीभान प्रतिनिधी : महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त तसेच २६ व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी येथे आयोजित राज्यस्तरीय कबड्डी पुरस्कार वितरण सोहळ्यात कबड्डी व शालेय क्रीडा क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय योगदान देणारे प्राचार्य सोपानराव काळे यांना राज्यस्तरीय कबड्डी पुरस्काराने गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार राज्याचे उद्योग विकास मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

   प्राचार्य सोपानराव काळे यांनी गेल्या तीन दशकांपासून कबड्डी आणि शालेय क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून त्यांनी कबड्डीची आवड जोपासली. सन १९९५ मध्ये तेलकुडगाव येथे कबड्डी संघाची स्थापना करून ग्रामीण भागात कबड्डी खेळाची भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर शारीरिक शिक्षण विषयात बी.पी.एड. पदवी प्राप्त करून शिक्षक म्हणून कार्य करताना विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम रुजविले.
     त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात क्रीडा शिक्षक आणि पुढे प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी संस्थेमध्ये उत्कृष्ट क्रीडा संस्कृती निर्माण केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक
खेळाडूंनी प्रो-कबड्डी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले. तसेच खो-खो, कुस्ती, धावणे आदी विविध क्रीडा प्रकारांमध्येही अनेक गुणवंत खेळाडू घडविण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
    कबड्डी क्षेत्रातील त्यांचे दीर्घकालीन योगदान, खेळाडू घडविण्याची तळमळ आणि ग्रामीण भागात खेळाचा प्रसार करण्यासाठी केलेल्या अथक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनने त्यांना हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केला.

Post a Comment

0 Comments